जगभरातील विविध उद्योगांमध्ये ह्यूमनॉइडनी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: भविष्यातील ह्यूमनॉइडची निर्मिती माणसाचे काम अधिकाधिक सोपे कसे करता येईल या दृष्टीने सुरू आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि यांत्रिक अचूकता यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण म्हणजे दूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने काम करणारे टेलिऑपेरेटेड म्हणजे रिमोटच्या साहाय्याने आणि संवर्धित (ऑगमेंटेड) ह्यूमनॉइड होय. या ह्युमनॉइडमुळे भविष्यात अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणले जाण्याची शक्यता आहे.

दूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने काम करणारे ह्यूमनॉइड हे बुद्धिमान, कार्यक्षम आणि वापरण्यास सोपे असतील. अधिक प्रगत संवेदक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणामुळे हे ह्यूमनॉइड त्याच्या चालकाला त्या त्या वेळी लागलीच असा अभिप्राय देऊ शकतील. त्यामुळे अचूकता आणि नियंत्रण यामध्ये सुधारणा होईल. एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहू इच्छिता पण त्याच वेळी तुम्हाला दुसरे अत्यंत महत्त्वाचे कामदेखील आहे, अशा वेळी तुम्ही दूरदृश्य प्रणालीद्वारे तो कार्यक्रम अनुभवू शकाल आणि दूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने काम करणाऱ्या ह्यूमनॉइडमार्फत लोकांशी संवादही साधू शकाल.

हेही वाचा >>> कुतूहल: प्रगत हयूमनॉइड

संवर्धित (ऑगमेंटेड) ह्यूमनॉइड हे स्वायत्तपणे काम करू शकतात आणि मानवी देखरेखीखालीही काम करतात. हे ह्यूमनॉइड काही प्रमाणात स्वतंत्रपणे कार्य करू शकतात, परंतु जटिल किंवा अनपेक्षित परिस्थितींस तोंड देताना मानवी चालकांकडून सल्ला किंवा आदेशदेखील घेऊ शकतात. ऑगमेंटेशनमध्ये ते दूरसंवेदन पद्धतीने, चालकाकडून आदेश स्वीकारतात. त्यामुळे हे ह्यूमनॉइड बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात आणि उत्तम कार्यक्षमता आणि अचूकता दर्शवतात. याचे सध्याचे उदाहरण म्हणजे, स्वयंचालित वाहने आणि त्या उद्याोगातील ह्यूमनॉइड हे आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: केविन वॉरविक

ह्यूमनॉइडच्या प्रगतीतील त्याही पुढील पायरी म्हणजे स्वायत्त ह्यूमनॉइड. नावाप्रमाणेच हे ह्यूमनॉइड एखाद्या घटनेला किंवा विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी कोणावरही जास्त अवलंबून नसतात. ते स्वत:च परिस्थितीशी सुसंगत निर्णय घेऊन कृती करतात. याचे एक उदाहरण म्हणजे ‘वितरक ह्यूमनॉइड’. हा ह्यूमनॉइड, वाहतूक, पादचारी, शहरी आराखडा, हवामान आणि आपत्कालीन परिस्थिती यासारख्या आसपासच्या परिस्थितीनुसार दिलेल्या पत्त्यावर सामान पोहोचवू शकतो. भविष्यातील या ह्यूमनॉइडमध्ये माणसांशी सभ्य वर्तन करण्याची क्षमता असेल आणि कोणत्याही परिस्थितीत लोक दुखावले जाणार नाहीत, अशा प्रकारची रचना असेल. उदाहरणार्थ, एखादे लहान मूल त्यांच्या पुढे हळू चालत असेल तर अपघात टाळण्यासाठी तो ह्यूमनॉइड एका इंचाऐवजी काही फूट मागे जाऊन धोका टाळू शकेल. या प्रगत स्वायत्त ह्यूमनॉइडमध्ये भविष्यात काहीही बिघाड झाल्यास ते स्वत:च स्वत:ला दुरुस्तदेखील करून घेतील अशी त्यांची रचना असेल.

गौरी सागर दशेापांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल office@mavipa.org
सकेंतस्थळ:http://www.mavipa.org