कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यातील महत्त्वाच्या योगदानासाठी हॅन्स मोरोवेक ओळखले जातात. रोबॉटना सुरक्षित हालचाल करण्याकरता स्थानिक माहितीचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. मोरोवेक यांचे कार्य रोबॉटला अधिक चांगली स्थानिक माहिती प्रदान करण्यावर केंद्रित होते. त्यांनी ‘थ्रीडी ऑक्युपन्सी ग्रिड’ची संकल्पना विकसित केली त्यामुळे रोबॉटला आजूबाजूच्या क्षेत्राची ओळख काही क्षणांत होते.

मोरोवेक यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. ऑस्ट्रिया, कॅनडा इथे शिकून त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात संगणक विभागात काम केले व नंतर कारनेगी मेलन विद्यापीठात रोबोटिक्स संस्थेचे संचालकपद सांभाळले. कारनेगी मेलन इन्स्टिट्यूटमध्ये मोरोवेक यांनी रोबोटिक्सची जगातील सर्वांत मोठी प्रयोगशाळा स्थापन केली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : शाळेची बस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

त्यांचे एक महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘मोरोवेक विरोधाभास’! यात त्यांनी म्हटले आहे ‘संगणकांना प्रौढ मानवाची बुद्धिमत्ता दर्शविणे सोपे असते परंतु अगदी एक वर्षाच्या मुलाची आकलनशक्ती किंवा गतिशीलता देणे जवळजवळ अशक्य आहे. उदाहरणार्थ बौद्धिक चाचणी उत्तम पद्धतीने उत्तीर्ण होणे किंवा ‘गो’सारखा क्लिष्ट खेळ खेळणे, मोठ्या आकड्यांचे वर्गमूळ काढणे हे सोपे पण साधासा विनोद किंवा रागावलेले समजणे, न अडखळता, न धडपडता खोलीत वावरणे या संकल्पना तुम्ही कुठल्या आज्ञावलीद्वारे संगणकाला पाठवणार?

ज्या मताकरिता मोरोवेक अतिशय प्रसिद्ध झाले आहेत ते म्हणजे ‘माणसाच्या मनाच्या आज्ञावलीची जर संगणकाला नक्कल करता आली तर २०४० ते २०५० पर्यंत संगणक इतका प्रगत होईल की रोबॉट मानवालाही नक्कीच मागे टाकतील.’ पुढे ते असेही म्हणतात की त्यामुळे जैविक मानव अखेरीस नामशेष होईल. मानवी मन टिकून राहील, पण मानवी शरीर यापुढे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून स्पर्धात्मक राहणार नाही.

त्यांच्या दीर्घ संशोधनकार्यावर आधारित अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. संगणकाचे जाल या विषयावरही त्यांनी सुरुवातीच्या काळात शोधनिबंध लिहिला आहे. माणसाला आपल्या मनातील नवीन कल्पना या जालामार्फत जगभर विनामूल्य लगेच प्रसारित करता येतात.

त्यांची ‘माइंड चिल्ड्रन: द फ्युचर ऑफ रोबॉट अँड ह्यूमन इंटेलिजन्स’ (१९८८) आणि ‘रोबॉट: मियर मशीन टू ट्रांसेंड माइंड’ (१९९९) ही दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वायत्त रोबॉट बनवण्याकरिता सी ग्रिड कॉर्पोरेशनची सहस्थापना केली आहे आणि त्यात ते सध्या कार्यरत असतात.

डॉ. अनला पंडित

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org