खेम शहानी यांनी १९४३ साली दुग्ध व अन्न तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. १९४७ साली त्यांनी दुग्ध रसायनशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली. १९५० साली ते विस्कॉन्सिंस विद्यापीठाचे पीएच.डी. झाले. १९५० ते १९५२ या कलावधीत इलिनोइस विद्यापीठात आणि १९५३ ते १९५७ या कालावधीत कोलंबिया येथील ओहिओ स्टेट विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले. १९५७ साली लिंकन येथे नेब्रेस्का विद्यापीठात दुग्ध विज्ञान विभागात ते रुजू झाले.
१९९४ साली तेथून निवृत्त झाल्यावर पुढे २००० सालापर्यंत ते तेथेच अध्यापन आणि संशोधनात कार्यरत होते. जैविक प्रक्रिया केलेले अन्न, लॅक्टिक बक्टेरिया प्रामुख्याने ‘लॅक्टोबॅसिलस अॅसिडोफिलस’, अन्नातील प्रतिजैविके, जीवनसत्त्वे आणि विषारी पदार्थ हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. खेम शहानी हे त्यांच्या ‘लॅक्टोबॅसिलस अॅसिडोफिलस’ या जिवाणूच्या ‘डीडीएस- १’ या प्रजातीच्या शोधासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. १९५९ साली त्यांनी हे काम नेब्रेस्का विद्यापीठात पूर्ण केले. प्रोबायोटिक म्हणजे शरीरासाठी, विशेषत: पचनसंस्थेसाठी, उपयुक्त असे सूक्ष्मजीव. त्यांच्या २०० शोधनिबंधांपैकी ८० निबंध हे प्रोबायोटिक्सवर होते.
‘डीडीएस-१’ हा जिवाणू ‘प्रोबायोटिक’ म्हणून वापरला जाऊ लागला. डीडीएस-१ जिवाणूचे विशेष गुणधर्म म्हणजे ते उदरातील आम्ल सहन करू शकतात आणि आतड्यावर त्यांचे यशस्वी रोपण होते. आतड्यावर त्याची जननक्षमता २०० पटींनी वाढते. १९८१ साली ‘नेब्रेस्का कल्चर्स’ नावाची प्रोबायोटिक्स तयार करणारी कंपनी त्यांनी स्थापन केली. जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांचे ते सल्लागार होते. अमेरिकन दुग्ध संघटनेचे ‘बोर्डेन’ पारितोषिक त्यांना १९६४ साली प्रदान करण्यात आले.
१९६६ साली त्यांना गेमा-सिग्मा-डेल्टा हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या शेतीविषयक कार्यासाठी देण्यात आला. १९७७ साली त्यांना नेब्रेस्का विद्यापीठाने ‘सिग्मा XI’ विशेष शास्त्रज्ञ म्हणून किताब बहाल केला. १९७७ साली अमेरिकन दुग्ध संघटनेचा लॅक्टिक जिवाणू क्षेत्रात उत्तम संशोधन केल्याबद्दल‘फायझर’ पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी दोन अमेरिकन पेटंट (क्रमांक ३.६८९.६४० आणि क्रमांक ४.२७९.९९८) प्राप्त केले आहेत. ‘कल्टिव्हेट हेल्थ फ्रॉम विदिन : डॉक्टर शहानीज गाइड टु प्रोबायोटिक्स’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते न्यूट्रसूटिकल कॉर्पोरेशन, अराइज अँड शाइन, अमेरिकन बायोलॉजिकल्स, सेल टेक, इनफिनिटी-२ अशा अनेक अन्नप्रक्रिया संस्थांचे सल्लागार होते. इटलीमधील सिसिली येथे व्याख्यानासाठी जात असताना ६ जुलै २००१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
– डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org