एव्हरेस्ट हे पृथ्वीवरचे सर्वात उंच शिखर सुमारे ८,८४८.८६ मीटर उंचीचे आहे. पृथ्वीचा इतिहास ज्या विविध कालखंडात विभागलेला आहे, त्यापैकी ऑर्डोव्हिशियन नावाच्या कालखंडात (सुमारे ४७ कोटी वर्षांपूर्वी) समुद्राच्या तळाशी निर्माण झालेले चुनखडकांचे थर आज मात्र एव्हरेस्टच्या शिखराजवळ आढळतात. त्या थरांमध्ये विविध सागरी जीवांचे जीवाश्म सापडतात. या चुनखडकांची निर्मिती सागराच्या तळाशी झाली याचा ते जीवाश्म नि:संदिग्ध पुरावा आहेत.

एव्हरेस्ट शिखराच्या परिसरातले खडक प्रामुख्याने रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) आहेत. हे खडक मूलत: अवसादि (सेडिमेंटरी) किंवा अग्निजन्य (इग्निअस) होते, तथापि खंडांचे परिवहन होताना भारतीय द्वीपकल्प ज्यावर विसावलेले होते, तो भारतीय भूपट्ट (इंडियन प्लेट), उत्तरेकडच्या युरेशियन भूपट्टावर विसावलेल्या तिबेटच्या पठाराला जाऊन धडकला. वाटेत असणाऱ्या टेथिस महासागराच्या तळाशी साठलेले अवसादांचे थर वर उचलले जाऊन हिमालय नावाची घड्यांची पर्वतरांग निर्माण झाली. ही भूवैज्ञानिक घडामोड होताना प्रचंड उष्णता आणि त्याचप्रमाणे दाबही निर्माण झाला, त्यामुळे मूळच्या खडकांमध्ये बदल होऊन तिथे रूपांतरित खडक निर्माण झाले.

एव्हरेस्ट हे ज्या पर्वताचे शिखर आहे, तो पर्वत तीन पाषाणसमूहांनी बनला आहे. त्यांची नावे चोमोलुंगमा पाषाणसमूह, उत्तर कोल पाषाणसमूह आणि रोंगबुक पाषाणसमूह अशी आहेत. चोमोलुंगमा पाषाणसमूहातले खडक शिखराच्याच आसपास, खूप उंचीवर आढळतात. ते मुख्यत्वे चुनखडकांचे आहेत. त्या थरांमध्ये विविध वर्गातल्या सजीवांचे जीवाश्म सापडतात. हेच जीवाश्म हा पाषाण समूह ४७ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाल्याची ग्वाही देतात. त्यापेक्षा खालच्या पातळीवर आल्यानंतर उत्तर कोल पाषाणसमूहातले खडक आहेत. या पाषाणसमूहात सुभाजा (शिस्ट) आणि पट्टिताश्म (नाइस) या प्रकारचे रूपांतरित खडक आढळतात. त्याहीपेक्षा खाली, त्या पर्वताच्या उतारांवर रोंगबुक पाषाणसमूहातले खडक आढळतात. ते उच्च श्रेणीचे रूपांतरित खडक आहेत. त्या पर्वताच्या पायथ्याशी ग्रनाइट नावाचा अग्निजन्य खडक आहे. काही वैज्ञानिकांच्या मते तप्त अवस्थेतून पृथ्वी जेव्हा थंड झाली आणि पृथ्वीचे जे पहिले कवच तयार झाले, त्या कवचाचा तो ग्रनाइट हा एक भाग आहे. तथापि या भागातल्या खडकांचा अभ्यास अजूनही खूपच प्राथमिक अवस्थेत आहे.

भारतीय भूपट्ट अजूनही दरवर्षी ५ सेंटीमीटर या वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे हिमालयाची उंचीही दर वर्षी. ०.२ ते ०.५ मिलिमीटर या वेगाने वाढत आहे, त्यामुळे हिमालयाचा संपूर्ण पट्टा भूकंपप्रवण झाला आहे.

डॉ. विनय दीक्षित, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org