आनंदवनातील निवासी (किमान अडीच हजार) बांधवांच्या पाण्याच्या सगळय़ा गरजा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या (संख्या तीन हजार ते साडेतीन हजार) दिवसभराच्या गरजा भागवण्याचे सामर्थ्य आनंदवनाच्या स्वत:च्या यंत्रणेत आहे. कोणताही बाहेरील स्रोत वापरला जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी इथेही फक्त नेहमीच्या विहिरीवरच पाणीपुरवठा अवलंबून होता. जसजशी अवलंबितांची संख्या वाढू लागली तशी तलावांची जोड देण्यात आली. ही या जिल्ह्यातील पारंपरिक व्यवस्था आहे. जमिनीच्या पोताचा अभ्यास करून विंधण विहिरींसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आणि तिथे विंधण विहिरी खणून त्यात सुयोग्य पंप बसवण्यात आले. या विंधण विहिरी आनंदवनाच्या एका बाजूला असल्याने जमिनीखालून साडेतीन किलोमीटर जलवाहिनी टाकून ते पाणी सर्व आनंदवनभर मिळेल याची व्यवस्था करण्यात आली. आपण सतत या विंधण विहिरींतून पाणी उपसत राहिलो तर कालांतराने त्या कोरडय़ा पडू शकतात ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्या परिसरात तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिकरीत्या खोलगट जागा निवडून तिथे खोली वाढवून तलावांची निर्मिती केली गेली. हे करताना निघालेली माती शेतात पसरली, अंतर्गत रस्त्यांसाठी मुरुम वापरला तर तलावाच्या बांधाच्या मजबुतीकरणासाठी वा इमारतीचा पाया भरताना दगड वापरले. सर्व उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा वापर पर्यावरणपूरक आहे.

अशी तलावांची खोली वाढवल्यामुळे पाणी साठवण वाढली. त्याचा उपयोग एकतर मत्स्यबीज सोडून मासे वाढवण्यासाठी केला गेला, नाहीतर थंडीच्या मोसमातील धान्य/ भाजीपाला पिकांकरिता करण्यात आला. या दोन्ही मार्गानी उत्पन्नात वाढ झाली हे निर्विवाद. याबरोबरच तलावातील काही पाणी बाष्पीभवनाने गेले तरी काही पाणी जमिनीत मुरते. या कारणाने तिथल्या पंचक्रोशीतील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. याचा प्रत्यय आनंदवन आणि परिसरातील गावांनी घेतला आहे. परिसरातील विहिरी पूर्वीच्या तुलनेत अधिक दिवस पाणी देऊ लागल्या. हे साध्या विहिरीबरोबर विंधण विहिरीबाबतीतही अनुभवायला मिळाले. एकदा उन्हाळा सुरू झाला की हे तलाव आटतात, मग तलावातील चांगली माती काढून शेतात त्याचा वापर करता येतो. त्याचबरोबर तलावाची डागडुजी करून बांध मजबूतही करता येतात. या सगळय़ा तलावांची जास्तीत जास्त पातळी नक्की करून अधिक पाणी जमा होऊन, तलावाला धोका होऊ नये, म्हणून अतिरिक्त पाणी बाहेर जाण्याची व्यवस्थाही केलेली आहे. ही खबरदारी घेतल्याने तलाव फुटून होणारे नुकसान टाळले तसेच पाणी वाया जाणार नाही. निसर्गाशी मैत्री ठेवत, विज्ञानाच्या साहाय्याने जलक्षेत्रात मिळवलेली आनंदवनची ही स्वयंपूर्णता आजघडीला निश्चितच अनुकरणीय आहे.

– दिलीप हेर्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal self sufficient water management in anandwan zws
First published on: 20-09-2022 at 03:04 IST