महाराष्ट्रातल्या प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये अजिंठा आणि वेरुळ या दोन ठिकाणांचा समावेश करावाच लागेल. त्यातही वेरुळला बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचे मंदिर असल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे लालसर पाषाणात बांधलेले मंदिर पाहताच, कोणाच्याही मनात एक विचार येतो, की महाराष्ट्रात सर्वत्र ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून निर्माण झालेला काळा कातळ आढळतो, मग घृष्णेश्वराचे मंदिर लालसर पाषाण वापरून का बांधले गेले असावे? हा पाषाण बाहेरून तर आणला नसावा?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण याचा शोध घ्यायला गेलो तर लक्षात येईल, की वेरुळ परिसरात काळ्या कातळांचे जे थर नजरेस पडतात, त्यात एक लालसर कातळाचाही थर आहे. या लालसर कातळाचे वैशिष्ट्य असे की बांधकामाच्या दृष्टिकोनातून तो अतिशय भक्कम दगड आहे. या थरातल्या पाषाणावर विदारणाचा (वेदरिंग) फारसा परिणाम होत नाही.

तेराव्या आणि चौदाव्या शतकात दिल्लीच्या सल्तनतीने घृष्णेश्वर मंदिराचा विध्वंस केला होता. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, राजे मालोजीराव भोसले, यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. पण नंतरही मुघल आणि मराठे यांच्या लढाया सुरूच होत्या. त्याची झळ या मंदिराला बसली आणि मंदिराचा पुन्हा एकदा विध्वंस झाला. तेव्हा मग अठराव्या शतकात इंदूर संस्थानच्या महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धाराच्या वेळी बांधकाम या मजबूत लालसर कातळात केले गेले.

भारतीय द्वीपकल्पात महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्येही आढळणाऱ्या काळ्या कातळाला भूविज्ञानात बेसाल्ट म्हणतात; तर बेसाल्टच्या अनेक थरांनी बनलेल्या पाषाणसमूहाला ‘दक्खनचे सोपानप्रस्तर’ (डेक्कन ट्रॅप) म्हणतात. सगळीकडे या कातळाचा रंग काळा असताना वेरुळसारख्या एखाददुसऱ्या ठिकाणी त्याला लालसर छटा का यावी, असा प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे.

याचे कारण असे आहे, की सर्व थरांमधले कातळ अगदी एकसारखे नसतात. त्यांचे बाह्यस्वरूप थोडेफार वेगवेगळे असते. जो लाव्हारस थंड होऊन कातळाचा एखादा थर बनला त्या लाव्हारसाचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) कसे होते; लाव्हारस दाट होता की पातळसर; आणि तो वेगाने थंड झाला की मंद गतीने; अशा काही कारणांनी बेसाल्टचे विविध प्रकार तयार झाले आहेत. क्वचित् थोड्या ठिकाणी कातळाचे असे काही थर आहेत, जे जास्त भाजले गेल्याने लालसर झाले आहेत. अशा थरांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असू शकते. असे थर वेरुळच्या परिसरात असून त्यातीलच लालसर पाषाण घृष्णेश्वराच्या बांधकामासाठी वापरले असावेत.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal stone of ghrishneshwar temple amy