कुठल्याही गोष्टीची हुबेहूब नक्कल करणे, म्हणजे कृत्रिमतेची ओढ हा अद्वितीय बुद्धिमत्तेचा धनी असलेल्या मानवाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. कृत्रिम मोती व हिरे निर्मिती हा त्याचा एक परिपाक आहे. निसर्गावर मात करण्याची लालसा ही त्याची पुढची पायरी मानता येईल. त्यामुळे नैसर्गिक साधनांना पर्याय म्हणून मानव विविध भौतिक गोष्टी निर्माण करत आला आहे, उदाहरणार्थ- कृत्रिम तलाव. त्याच मालिकेत कृत्रिम उपग्रहांची निर्मिती हे लक्षणीय पाऊल आहे.
असंख्य अपंग व्यक्तींसाठी वरदान ठरलेले हात, पाय असे कित्येक अवयव कृत्रिमरीत्या यशस्वीपणे निर्माण करणे, ही आपल्या नक्कल करण्याच्या प्रवृत्तीची विधायक फलश्रुती आहे. साहजिकच मानवाने ध्यास घेतलेला या श्रुंखलेतील पुढचा टप्पा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणे. आपल्या उपजत बुद्धिमत्तेच्या तोडीची प्रखर बुद्धिमत्ता, चातुर्य आणि लवचीकता असलेली प्रणाली मूर्त स्वरूपात घडवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संगणकाचा विकास हा त्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला. क्लिष्ट आकडेमोड, शब्दांचे खेळ, अन्य यंत्रांवर नियंत्रण मिळविणे आणि बुद्धिबळासारख्या आव्हानात्मक खेळात संगणक आता मानवापेक्षा वरचढ ठरल्याचे आपण अनुभवले आहे.
परिपूर्ण यंत्रमानव (रोबो) निर्मितीची संकल्पना सुरुवातीपासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासाचा गाभा ठरली आहे. मागील ७५ वर्षांत या संदर्भात झालेल्या घडामोडींतून आपल्याला बरेच मार्गदर्शन मिळाले असले तरी, आपली बुद्धी प्रत्यक्षात कशी काम करते हे अद्याप न सुटलेले कोडे असून तेच या प्रगतीमधील सर्वात मोठा अडसर आहे. त्याच्याशी संलग्न मानवी मन, संवेदना, भावना अशा कार्यप्रणालींची आपली समज आजदेखील अतिशय मर्यादित आहे. त्याबाबत बहुशाखीय संशोधन सुरू आहे, ज्यात संगणक विविध मार्गानी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मात्र हार न मानता, सुरुवात प्राथमिक गोष्टींनी करून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिखर गाठण्यासाठी पायरी-पायरीने चढण्याचा मार्ग अनुसरला गेला आहे. उदाहरणार्थ, गणिती प्रमेये सिद्ध करणाऱ्या, भाषांतर करणाऱ्या आणि डोळय़ांसारखी यांत्रिक दृष्टी निर्माण करणाऱ्या प्रणाली आता बऱ्याच प्रगत झाल्या आहेत. तरी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमेल तितक्या सैद्धांतिक, तात्त्विक, उपयोजन आणि एकूण मानवी आयुष्यावर, समाजावर प्रभाव, अशा पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न आपण यापुढे करणार आहोत.
डॉ. विवेक पाटकर,मराठी विज्ञान परिषद