विषाणू वाढीसाठी नेहमीच प्राणी, वनस्पती किंवा जिवाणूसदृश जिवंत पेशींची गरज असते, कारण विषाणू हे परजीवी असतात. यांतील काही विषाणू माणसांच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात राहतात, काही रोग निर्माण करतात, तर काही तसेच सुप्तावस्थेत पडून असतात. जेव्हा एखादा नवीन विषाणू (उदाहरणार्थ, जगाने नुकताच अनुभवलेला कोविड-१९ चा विषाणू- सार्स कोव्ह-२) मोठ्या प्रमाणावर रोगसदृश साथींसाठी कारणीभूत होतो, तेव्हा त्याचे निदान, त्यावर लस किंवा त्या विषाणूविरुद्ध एखादे रामबाण औषध शोधणे आवश्यक ठरते. यांसाठी प्रयोगशाळेत त्याला मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी जिवंत पेशींची किंवा प्राण्यांची गरज असतेच. कारण विषाणूंना त्यांची वंशावळ वाढवण्यासाठी स्वत:ची अशी नैसर्गिक शक्ती (जैविक उत्प्रेरक योजना) नसते म्हणून ते नेहमी दुसऱ्या सजीवांवर किंवा त्यांच्या सजीव पेशींवर अवलंबून राहतात.

आतापर्यंत शास्त्रज्ञ मंडळींनी बऱ्याच प्रकारच्या एकजातीय ऊतीसमूह (सेल लाइन) निर्माण करून ठेवले आहेत. यांत सर्वात वरचा नंबर ‘व्हेरो’ नावाच्या ऊतीसमूहाचा लागतो. जपानचे शास्त्रज्ञ डॉ. यासुमुरा व कावाकीता यांनी जपान येथील चीबा विद्यापीठात १९६२ साली आफ्रिकन हिरव्या माकडाच्या (सरकोपिथेकस) मूत्रपिंडापासून प्रथम हा ऊतीसमूह तयार केला. ‘verda reno’ म्हणजे ‘हिरवी किडनी’, यावरून त्या ऊतीसमूहाला ‘व्हेरो’ नाव देण्यात आले. २०१४ साली त्या पेशीच्या जनुकांचे संपूर्ण अनुक्रमण करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. व्हेरो ऊतींमध्ये अनेक विषाणूंची वंशावळ वाढवता येणे शक्य आहे; म्हणून विषाणूंचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ व्हेरो ऊतींना ‘सुवर्ण ऊती’ म्हणतात.

प्रयोगशाळेत व्हेरो ऊतींच्या वसाहती प्लेट किंवा फ्लाक्समध्ये द्रवरूप पोषणमाध्यम, कार्बन डायऑक्साइड, योग्य तापमान, आर्द्रता देऊन तयार करतात. त्यावर वेगवेगळे विषाणू वाढवता येतात. त्यांची वाढ पारदर्शक प्लाक्सच्या स्वरूपात बघता येते. अशा रीतीने प्रयोगशाळेत पोलिओ, एसव्ही-५/४०, गोवर, गालगुंड, डेंगी, चिकुनगुन्या, जपानी मस्तिष्कज्वर, झिका, जर्मन गोवर, इन्फ्लूएंझा, पॅराइन्फ्लूएंझा, वॅक्सिनिया, मंकीपॉक्स, निपाह, चांदीपुरा इत्यादी असंख्य विषाणू सहज वाढवता येतात.

जगात या पेशींचे बरेच मूळस्राोत (क्लोन) उपलब्ध आहेत (एटीसीसी, ईटीसीसी इ.). तसेच जनुकीय पद्धतीने व्हेरो ऊतींच्या उपजाती तयार केल्या आहेत. या उपजाती, विशिष्ट प्रकारच्या संवेदकांमार्फत (रिसेप्टर) विशिष्ट विषाणूंना आकर्षित करून त्यांची वंशावळ मोठ्या प्रमाणात वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरो ऊतींचा वापर विषाणू लसनिर्मिती करण्यासाठी मान्यता फार पूर्वीच दिली आहे. आणि त्याचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हेरो ऊतींचे संवर्धन हे मानवजातीस एक वरदानच ठरले आहे.

डॉ. सुनील वैद्या

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org