मनू प्रकाश हा भारतीय तरुण शास्त्रज्ञ आहे. पेशाने ‘बायोइंजिनीयर’ आहे. ते फोल्डस्कोप या शोधासाठी जगभर ओळखले जातात. जीम सायबलस्की यांच्या समवेत त्यांनी कागदाचे तुकडे आणि भिंग यांची जुळवणी करून हा फोल्डस्कोप तयार केला असून त्याची किंमत अत्यंत कमी (एकासाठी सुमारे ६०० रु.; दहाच्या संचासाठी ५९०० रुपये) आहे.

सूक्ष्मदर्शक म्हणजे अवजड वजनाचे नाजूक यंत्र! त्याची बारकाईने करावी लागणारी देखभाल! या त्याच्या लक्षणांमुळे सूक्ष्मदर्शकाची उपयोजिता प्रयोगशाळेपर्यंत सिमित राहिली. त्यापेक्षा सूक्ष्मदर्शकयंत्र हे खिशात घेऊन फिरता येईल का? त्याची भिंगरचना सुलभ करता येईल का? धातूपेक्षा कागदापासून ते तयार करता येईल का? नमुने प्रयोगशाळेत आणून मग या यंत्राखाली बघायचे; यापेक्षा हे यंत्रच घेऊन सहजतेने या नमुन्यांपर्यंत नेता येईल का? अत्यंत कमी आणि परवडेल अशा किमतीत ते आपल्याला विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला २१व्या शतकात सुरुवात झाली. प्रामुख्याने यंत्र तंत्रज्ञान, संरचनाशास्त्र आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रात आमूलाग्र अशी क्रांती झाली.

ही क्रांती ‘डिझायनिंग’ संदर्भातली आहे. त्यातला एक विषय म्हणजे ‘ओरिगामी’. ही कागद दुमडण्याची (पेपर फोल्डिंग) प्रामुख्याने जपानी कला आहे. कागद दुमडून द्विमिती किंवा त्रिमिती वस्तुरचना तयार करण्याची ही कला आहे. स्टानफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मनू प्रकाश आणि त्यांचे विद्यार्थी डॉक्टर जिम सायबल्स्कि यांनी जेव्हा गरीब देशांचा दौरा केला तेव्हा त्यांना असे आढळून आले की, विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी पुरेशी सूक्ष्मदर्शकयंत्रे नव्हती.

ती एक मौल्यवान वस्तू म्हणून गणली जात होती. हे बघून त्यांनी अत्यंत सहजतेने वापरता येईल आणि परवडेल आशा किमतीत कागदाचा वापर करून एक घडीचा मायक्रोस्कोप तयार करण्याचे ठरवले. त्यांनी तो तयारही केला, त्यालाच ‘फोल्डस्कोप’ हे नाव दिले गेले.या सूक्ष्मदर्शकाखाली जीवाणू, बुरशी, आदिजीव, मानवी पेशी, वनस्पतीपेशी, कीटक तसेच कापसाचा धागा आणि तत्सम पदार्थ बघता येतात.

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये इंडिया झ्र यूएस स्टार्टअप कनेक्ट या कार्यक्रमांतर्गत २७ सप्टेंबर २०१५ या दिवशी झालेल्या करारान्वये भारताच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी, फोल्डस्कोप इन्स्ट्रुमेंट आणि प्रकाश लॅब यांच्या संयुक्त विद्यामाने हा प्रकल्प ईशान्य भारतातील राज्यांत ९२ शाळांत आणि ३१७ महाविद्यालयांत कार्यान्वित करण्यात आला आहे.

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org