डॉ. जयश्री कृष्णा सैनिस
तापरागी म्हणजे उष्णताप्रेमी जिवाणू. पृथ्वीवर जेथे जेथे तापमान जास्त असते तेथे असे उष्णताप्रेमी जीव आढळतात. वेगवेगळे तापरागी जिवाणू ४१ ते १२२ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात असतात. असे जिवाणू आसमंतातील रसायने व सूर्यप्रकाश वापरून गरम आणि क्वचित उकळत्या पाण्यातदेखील आपली रंगीत जीवसृष्टी निर्माण करतात. तापरागी जिवाणू गरम पाण्याच्या झऱ्यात, खोल समुद्रातील हायड्रोथर्मल व्हेंटच्या धुराड्यात किंवा कुजलेल्या खतात आढळतात.
तापरागी जिवाणूंचे वर्गीकरण ते ज्या तापमानाला नीटपणे जगू शकतात यावरून करतात. जसे की ५०-६० अंश सेल्सिअस तापमानाला जगणाऱ्यांना ‘तापरागी’ (थर्मोफिल्स) जिवाणू, ६५-७९ अंश सेल्सिअस तापमानाला जगणाऱ्यांना अति-तापरागी’ जिवाणू, तर ८० अंश सेल्सिअस तापमानाच्याही वर तापमानाला जगणाऱ्यांना अत्याधिक तापरागी (हायपर थर्मोफिल्स) जिवाणू’ असे म्हटले जाते. तापरागी जिवाणू ५० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला जगूच शकत नाहीत.
यातील काही जिवाणू स्वत:च्या संवर्धनासाठी गंधकाचा वापर करतात आणि विनॉक्सी श्वसन करतात, तर काहींना जगण्यासाठी खूप आम्लतेची गरज असते. प्रकाशसंश्लेषणाचाही उपयोग काही तापरागी जिवाणू करतात. सलफोलोबस सोलफॅटॅरिकस व सलफोलोबस अॅसिडोकल्डारियस, पायरोडीक्टियम हे अत्याधिक तापरागी जिवाणू आहेत. सायनिडियम काल्डारियम हे लाल रंगाचे शेवाळ ५७ अंश सेल्सिअसपर्यंत जगू शकते. याशिवाय काही सायानोबॅक्टेरिया पण तापरागी असतात. क्लोरोफ्लेक्सस ऑरंटियकस हे तापरागी जिवाणू ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानावर प्रकाशसंश्लेषणाची क्रिया वापरून स्वसंवर्धन करतात. पायरोलोबस फुमारी तर समुद्रातील जवळजवळ साडेतीन हजार मीटर खोलीवर असलेल्या हायड्रोथर्मल व्हेंटमध्ये १२१ अंश सेल्सिअस तापमानवर पण जिवंत राहतो! अलीसायक्लोबॅसिलाय हे फळांच्या आंबट रसात वाढणारे जिवाणूही तापरागी असतात व सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या निर्जंतुकीकरणाला दाद देत नाहीत व त्यामुळे फळांचे रस फार काळ टिकत नाहीत.
१९८० साली थर्मलअॅक्वाटिकस या तापरागी जिवाणूने जीवअभियांत्रिकी शास्त्रात क्रांती घडवून आणली. या जिवाणूतील डीएनएपॉलीमरेज या विकराच्या साहाय्याने जनुकाच्या प्रती बनविण्याची किचकट प्रक्रिया अगदी सोपी झाली, कारण हे विकर ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानालाही खराब होत नाही. बॅसिलस स्टीरोथर्मोफिलस जिवाणूतील काही विकरे कपडे धुण्याच्या पावडरमध्ये वापरतात; कारण ती गरम पाण्यात पण कार्यक्षम असतात. ह्या जिवाणूंच्या उष्णताप्रेमाचे रहस्य मात्र अजून नीट उलगडलेले नाही. या जिवाणूवर आक्रमण करणाऱ्या विषाणूंचा पण आता शोध लागला आहे.
– डॉ. जयश्री कृष्णा सैनिस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org