१९४० साली राजकोट संस्थानचा राजा धर्मेद्रसिंहजी सिंहाची शिकार करताना स्वतच शिकार झाला आणि त्याच्या छळवादातून जनतेची सुटका झाली. धर्मेद्रसिंह नंतर गादीवर आलेला त्याचा भाऊ प्रद्युम्नसिंहजी हा उत्तम प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने राज्यात अनेक सुधारणा करण्यास सुरुवात केली, पण त्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू होऊन विकास योजनांच्या कार्यवाहीला खीळ बसली. युद्धाची धुमश्चक्री संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ, आंदोलने इत्यादींनी गजबजलेल्या काळात प्रद्युम्नसिंहजी काही नवीन करू शकले नाहीत.
१५ फेब्रुवारी १९४८ रोजी राजकोट संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. ७३० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाची लोकसंख्या १९२१ साली ६१००० होती.  ३४ खेडी अंतर्भूत असलेल्या या राज्याला  ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
महात्मा गांधींचे वडील काही काळ राजकोट संस्थानचे दिवाण होते. महात्मा गांधी राजकोटला अिहसेवर आधारित स्वातंत्र्य चळवळींची प्रयोगशाळा म्हणत. स्वातंत्र्य आंदोलनविषयक अनेक घटना, अनेक निर्णय यांचे राजकोट राज्य साक्षीदार आहे.
राजकोट स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर सौराष्ट्र या नवीन प्रांतामध्ये वर्ग केले जाऊन राजकोट शहर या प्रांताची राजधानी करण्यात आली. यू. एन. ढेबर हे सौराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री आणि जामनगरचे जामश्री, राज्यपाल नियुक्त झाले. राजकोटच्या जडेजा राजघराण्याचे सध्याचे वंशज मनोहरसिंहजी गुजरातमधील मोठे राजकीय कार्यकत्रे असून गुजरात विधानसभेवर अनेक वेळा निवडून आले आहेत आणि त्यांनी तिथले आरोग्यमंत्रीपद भूषविले आहे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुतूहल – सूतकताईची आधुनिक तंत्रे
बांगडी साचा आजही सर्वात लोकप्रिय असला तरी त्याच्या काही मर्यादा आहेत. पहिली म्हणजे या साच्यावर तयार होणारी बॉबिन आकाराने अतिशय लहान असते आणि तिच्यावर फक्त ५० ते ६० ग्रॅम एवढेच सूत मावते. त्यामुळे कापड बनविताना लागणारे मोठय़ा लांबीचे सूत तयार करताना अनेक बॉबिनवरील सूत एकमेकांशी गाठवून सुताची लांबी वाढवावी लागते आणि त्यामुळे कापडामध्ये गाठी येतात व कापडाचा दर्जा कमी होतो. दुसरे म्हणजे सुताला पीळ देण्यासाठी संपूर्ण बॉबिन फिरवावी लागते आणि त्यामुळे या साच्यास मोठय़ा प्रमाणात ऊर्जा लागते व शिवाय चात्याची गती मर्यादित होते व यामुळे उत्पादकता वाढविण्यावर मर्यादा येतात. बांगडी साच्याच्या या मर्यादा दूर करून उत्पादकता वाढविण्यासाठी अनेक नवी तंत्रे विकसित करण्यात आली, त्यापकी खालील पद्धत अधिक प्रचलित झाली आहे.
खुला शेडा कताई पद्धत (ओपन एंड स्पििनग) : ही पद्धत सर्वप्रथम झेक कंपनीने इ.स. १९६५ मध्ये विकसित केली. त्यानंतर या यंत्रात अनेक सुधारणा करण्यात आल्या. या यंत्राला कापूस हा खेचण साच्याच्या पेळूच्या रूपात पुरविला जातो. पेळूची जाडी कमी करण्यासाठी दातेरी रुळाचा वापर केला जातो. या यंत्राचा प्रमुख भाग म्हणजे गोल फिरणारी एक तबकडी असते. या तबकडीमध्ये दातेरी रुळाने सुटे केलेले तंतू पाठविले जातात व या तबकडीच्या गोल फिरण्यामुळे या तंतूंना पीळ देऊन सूत तयार केले जाते. हे तयार झालेले सूत नंतर एका गोळ्यावर (कोन) गुंडाळले जाते. या साच्याचे उत्पादन हे बांगडी साच्यापेक्षा ४ ते ७ पटीने अधिक असते. या यंत्रावर तयार होणाऱ्या सुताची ताकद बांगडी साच्यावर तयार केलेल्या सुतापेक्षा २५% ते ३०% कमी असते; परंतु इतर बाबतीत या सुताचा दर्जा अधिक चांगला असतो. या पद्धतीची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे या साच्यावर फक्त ३० सुतांकापर्यंतचे जाडे सूतच यशस्वीपणे कातता येते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merger of rajkot institution