भराव अगदी सहज घालता येतो. जागेची कमतरता भासू लागली की समुद्राला मागे हटवणे हे अगदी सहज केले जाते. पण यातून खूप मोठया प्रमाणात साधन-संपदेचा नायनाट होतो. याशिवाय एका ठिकाणचे पाणी मागे ढकलले की ते कोठे तरी वर चढतेच. घरबांधणी, वसाहती निर्माण करणे, बंदरे, वाहतुकीसाठी किनारी मार्ग बांधणे, असे अनेक प्रश्न सोडवताना सागराला मागे हटवले जाते. त्यामुळेच मुळात सात बेटांचा समूह असलेली एकेकाळची मुंबई १८४५ मध्येच एक खूप मोठा सलग भूखंड झाली. किनाऱ्यालगतच्या प्रत्येक शहराची हीच शोकांतिका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भराव साधारणपणे चार प्रकारे घातला जातो.

‘ इन-फिलिंग’ ही पद्धत अधिक प्रमाणात वापरली जाते. मोठाले खडक, सुकी माती इत्यादी आणून टाकले जातात आणि पाणी हटवून जमीन तयार केली जाते. भरावाच्या दुसऱ्या पद्धतीत जहाजांसाठी बंदरे बांधण्यासाठी नैसर्गिक अवसाद (गाळ) काढला जातो, म्हणून याला ‘लॅण्ड ड्रेजिंग’ म्हणतात.

हेही वाचा >>> कुतूहल: सागरविषयक मार्गदर्शक पुस्तक

‘ड्रेनिंग’ या तिसऱ्या पद्धतीत पाण्यात अर्धवट बुडालेल्या सुपीक गाळाचा वापर शेतीसाठी केला जातो. यामुळे पाणथळ जागांना भूमीत बदलले गेल्याने तेथील पूर्ण परिसंस्था नष्ट होते. तेथे येणारे स्थलांतरित पक्षी निघून जातात. परंतु, यात फारसा आर्थिक फायदा दिसत नसल्याने लोकांना त्यात वावगे वाटत नाही.

‘पॉन्डिरग’ म्हणजेच दलदलीच्या जागांतून पाणी-उपसा करणे आणि शुष्क जमिनीवर सिंचनाने पाणी आणून त्याचा शेतीसाठी वापर करणे, हादेखील भरावाचाच प्रकार आहे. आखाती देशांमध्ये अशा प्रकारचे भूमीबदल दिसून येतात. 

फिलिपाईनचे व्यापारी क्षेत्र, मुंबईचा संपूर्ण किनारा, स्पेनमधील बार्सिलोना शहर, न्यूयॉर्कमध्ये असणारे हडसन नदीला हटवून केलेले बॅटरी पार्क, ही सर्वात मोठी भराव घालून केलेली क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. भरावाने सागरी अधिवास व प्रवाळ प्रजाती नष्ट होणे, मातीची धूप आणि पुराचा धोका या समस्या निर्माण होऊ लागतात. सिंगापूर शहर १८२२ मध्ये समुद्रावर भराव घालून तयार केले गेले, त्यामुळे तेथील ९५ टक्के कांदळवने नष्ट झाली. भारतातही अनेक कांदळवने नष्ट करण्यात आली आहेत. संपूर्ण नवी मुंबई अशाच प्रकारच्या भरावावर उभी आहे. परंतु आता जागरूकता आल्यामुळे याच नव्या मुंबईत कांदळवन प्रतिष्ठान स्थापन झाले आहे.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Method of reclaiming land from the sea method of backfill in layers for sea reclamation zws