जीवांची प्रकाशमान होण्याची क्षमता म्हणजेच ‘जीवदीप्ती’! जीवसृष्टीतील काही सजीव शरीरामधील पेशींतील विशिष्ट जीवरासायनिक प्रक्रियेमुळे प्रकाशरूपी ऊर्जा निर्माण करू शकतात. यामध्ये एक खास ‘वितंचक’ महत्त्वाची भूमिका बजावते आणि पेशीतील रासायनिक ऊर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. समुद्रात सापडणाऱ्या अनेक वनस्पती आणि प्राणी जसे- कवक, काही जिवाणू, मासे अशी क्षमता दाखवतात. वनस्पती, बहुचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी यांमध्ये नैसर्गिकपणे हा गुणधर्म दिसत नाही. याउलट माशांच्या कुजणाऱ्या शरीरावर एखाद्या भुताटकीप्रमाणे प्रकाशमान होणारे जिवाणू सहज दिसू शकतात. या प्रकाशाबरोबर निर्माण होणाऱ्या उष्णतेला ‘थंड उष्णता’ असे म्हणतात. ‘लुसिफेरीन’ नावाच्या अणूचे ‘लुसिफरेझ’ या वितंचकामुळे ऑक्सिडेशन होते आणि त्यादरम्यान प्रकाश व उष्णता निर्माण होतात. हे वितंचक विविध जीवांमध्ये विविध प्रकारचे असते. लुसिफेरीन संपूर्ण ऑक्सिडाइझ होईपर्यंत प्रकाशाची निर्मिती होत राहते. जमकातील ‘ओयस्टर बे’, उत्तर बोर्नियोतील ‘संड्कन बे’ हे अशा प्रकाशमान होणाऱ्या जीवांसाठी प्रसिद्ध आहेत.

समुद्रात चमकणारे प्रोटोझोंस, रात्री चमकणारे काजवे, काही कीटक, कवक.. अशी जीवदीप्तीची उदाहरणे देता येतील. हे फ्लशलाइट स्वत:च्या प्रजातीच्या नर अथवा मादीला ओळखण्यासाठी उपयोगी ठरतात. प्रकाशाची प्रखरता, दोन प्रकाशांतील वेळ आणि प्रकाश टिकून राहण्याची वेळ या सर्व गोष्टी प्रत्येक प्रजातीसाठी वेगळ्या असतात आणि त्यामुळेच गर्द अंधारातसुद्धा मीलनोत्सुक नर/मादी एकमेकांना ओळखतात. हा प्रकाशमान होण्याचा गुणधर्म जीवाला आपले अस्तित्व राखण्यासाठी, तसेच संरक्षणासाठी उपयोगी ठरतो.

जेलीफिशसारख्या प्राण्यांमध्ये लुसिफेरीन- लुसिफरेझ या प्रक्रियेव्यतिरिक्त फोटो-प्रोटीन आणि कॅल्शियम यांच्या संयुगामुळे प्रकाश निर्माण होतो. शास्त्रज्ञांनी लुसिफेरीनचे रासायनिक गुणधर्म उलगडले आहेत. काजव्यातील लुसिफेरीनची संरचना शोधून प्रयोगशाळेत तीन प्रकारचे लुसिफेरीन तयार केले गेले आहे. या सर्व संशोधनामुळे जीवदीप्ती ही प्रक्रिया समजून घेणे सोपे झाले आहे. समुद्रातील चिटोप्तेरस नावाचा प्राणी, कोम्बजेलीस, जेलीफिश, डायनोफ्लॅजीलेट यांमध्ये ‘सिन्तीलोन’ नावाचा एक कण भोवतालचे पाणी जास्त आम्लयुक्त झाले की प्रकाशमान होतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे या प्रकाशनिर्मितीनंतर कोणतेही प्रदूषण होत नाही!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org