हरितगृह वायूंची संख्या सहा आहे त्यातील कर्बवायू आणि मिथेन वायू यांचा पर्यावरण ढासळण्यामध्ये महत्त्वाचा भाग असला तरी उरलेले चार म्हणजे बाष्प, नायट्रस ऑक्साइड, ओझोन आणि सीएफसी (कार्बन फ्लोरो कार्बन) या वायूंचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. हे तसे मानव निर्मित असून उष्णता शोषण करून सभोवतालचे तापंमान वाढवण्याचे कार्य करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पाण्याला अमृत समजून जपून वापरा’ असा संदेश दिला जातो, तेच पाणी प्रत्यक्षात मात्र ढिसाळपणे वापरले की उष्णतेमुळे या पाण्याचे बाष्प होते आणि हे बाष्प पुन्हा उष्णता ग्रहण करून ठेवते म्हणूनच उपलब्ध पाणी जपून वापरावयास हवे. नायट्रस ऑक्साइड हा सुध्दा असाच एक उष्णता शोषण करून सुदृढ पर्यावरणास हानी पोहचविणारा हरितगृह वायू आहे. रासायनिक शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर नत्र खते वापरणे हे या वायूच्या निर्मितीस आमंत्रणच आहे. वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढते तेव्हा हा वायूही वाढतो, कारण त्यांच्या धुरामध्ये या वायूचे प्रमाण लक्षणीय असते. जेथे अनियंत्रित विकास तेथे हा वायू हे आता समीकरणच झाले आहे.

पृथ्वीच्या भूपृष्ठापासून दहा किमी उंचीवर आपणास ओझोन या वायूचा जाड थर आढळतो. पृथ्वीवरील सर्व सजिवासाठी हे संरक्षण कवच आहे पण जेव्हा ओझोन वायू भूपृष्ठालगत प्राणवायूच्या विघटनामुळे तयार होऊ लागल्यास तो पर्यावरणासाठी हानीकारक ठरतो. ओझोनची अशी निर्मिती पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असते.

सीएफसी म्हणजेच मानव निर्मित कूलिंग गॅस. हा वायू वातानुकूलन यंत्रे (एसी) किंवा शीतपेटय़ा (फ्रीझर) यांमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी वापरला जातो. मात्र नियंत्रित जागेत थंडावा निर्माण करतानाच हा वायू हळुहळू वातावरणातही प्रवेश करतो, तेव्हा मोठय़ा प्रमाणात उष्णता ग्रहण करून हवेत उबदारपणा वाढविण्याचेही कार्य करत असतो.

या चारही हरितगृह वायूंना नियंत्रणात ठेवून पर्यावरण सुदृढ  करण्याचे कार्य आपण आपली जीवनशैली बदलून सहज साध्य करु शकतो. शेवटी  वातावरण आणि पर्यावरण यात तुझे माझे असे काही नसून ते आपले सर्वाचेच आहे ही भावना जनमानसात निर्माण होणे गरजेचे आहे. ‘तो करतो मग मी का नको?’ या भूमिकेमध्ये बदल झाला तरच या हरितगृहवायूंवर आपले नियंत्रण सहज होऊ शकते. सुदृढ पर्यावरण हा माझा हक्क आहे असे म्हणताना आपण त्यासाठी किती जबाबदारीने वागतो हेही तेवढेच महत्त्वाचे असते.

– डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Other greenhouse gases akp
First published on: 14-01-2020 at 00:24 IST