जीवसमूहातील सर्वात प्रगत प्रजाती कोणती, या प्रश्नाचे उत्तर देताना प्रगतीची (अॅडव्हान्समेंट) व्याख्या कशी केली जाते हे महत्त्वाचे ठरते. जी बदलत्या परिस्थितीत टिकून राहते ती प्रगत प्रजाती असे म्हटले तर एड्स एचआयव्हीसारखे विषाणू (व्हायरस) सर्वात प्रगत म्हणता येतील. कीटकांची अनेक कुळे विभिन्न परिस्थितीत राहू शकतात इतकेच नव्हे तर डास, घरमाश्या, झुरळे, ढेकूण यांसारखे कीटक निरनिराळ्या कीटकनाशकांना पचवून प्रजनन करीत राहतात म्हणून या कीटकांना प्रगत म्हणता येईल. बुद्धिमत्ता व दोन पायांवर उभे असल्याने मोकळ्या राहिलेल्या हातांचा उपयोग करीत, विविध अवजारे, तंत्रज्ञान वापरणारे मानव ‘प्रगत’ म्हणायचे तर त्यांनी स्वत:च्याच विनाशाकडे वाढत्या वेगाने प्रवास केल्याचे दिसते.
खाण्यायोग्य वनस्पती-प्राणी शोधीत फिरणाऱ्या पूर्वजांपासून, शेती-पशुपालन करीत स्थिर जीवन जगण्याच्या स्थितीपर्यंत प्रवास म्हणजे प्रगती का? निसर्ग-नियमांविपरीत, कमीत कमी क्षेत्रात एकाच वनस्पतीची शेती वा प्राणी प्रजातीचे संगोपन करीत जगताना भिन्न परजीवी (पॅरासाइट) रोग निर्माण करीत आणि मग त्यावर मात करण्यासाठी विविध विषकसदृश कीटकनाशक (पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड) औषधांचा मारा करीत व खते, संप्रेरके यांचा वापर करून उत्पन्न वाढविण्यास प्रयास करावा लागणे म्हणजे प्रगती काय? रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अनिर्बंध वापर केल्याने जमिनीची धूप होते व घसरलेला दर्जा तिला नापीक बनवतो, याला कसे प्रगती म्हणणार? प्रगत कुटुंबाकडे/ गावाकडे/ राज्याकडे सर्वाधिक पशुधन असणे एके काळी अपेक्षित असे. आजही दूध, अंडी, मांस इत्यादींसाठी मोठय़ा संख्येने पशु-पक्षी पाळले जातात, पण त्यांच्या अन्नासाठी एतद्देशीय झाडे तोडून चारा देणाऱ्या वनस्पतींची लागवड करून नैसर्गिकपरिसंस्थांचा विनाश केला गेला व आजही होत आहे. नैसर्गिकतृणभक्ष्यी प्राणी उपासमारीने नाहीसे होत गेले आहेत. नैसर्गिकनिवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीला मानवी निवडीतून होणारी उत्क्रांती शह देते आहे. संकरित (हायब्रिड) जनुक-परिवíतत प्रजाती आणि वाणे (व्हरायटीज) नैसर्गिकप्रजातींना विनाशाकडे लोटत आहेत. स्वकेंद्रित दृष्टिकोनामुळे मानवाने प्रगतीसाठी जीवावरणात घातक बदल घडवून आणले आहेत. एखाद्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, देशाचा वा खंडाचा ‘विकास’ म्हणजे वाढते दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय सकल उत्पादन (जीडीपी), वाढता संसाधन-वापर, वाढता ऊर्जा- वापर असाच केला जातो. महात्मा गांधींनी म्हटले आहे की, निसर्ग माणसाच्या गरजा भागवू शकेल पण त्याची हाव नाही. प्रगत-विकसित म्हणवल्या जाणाऱ्या देशांनी केवळ कबरेत्सर्जन (कार्बन एमिशन) पराकोटीचे केले नसून अत्यंत संहारक अस्त्र-शस्त्र निर्मितीदेखील केली आहे. विकसनशील देश त्यांचा कित्ता गिरवू पाहत आहेत. कोणताही आर्थिक विकास नैसर्गिकसंसाधने न वापरता होऊच शकत नाही. अतिवापरामुळेच विविध प्रकारचे प्रदूषण होत आहे व नैसर्गिकसंसाधनांचा ऱ्हास होत आहे. ऋतुमान बदल आज आणीबाणीच्या पातळीवर पोहोचले असून जोवर माणसे पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारत नाहीत, तोवर त्यांना अविकसित समजण्याची वेळ आली आहे.
– डॉ. पुरुषोत्तम काळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org