वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होऊ लागते. सन १७८७ साली होरस डी सॉश्युअर या जिनेव्हातील संशोधकाने माउंट ब्लांक या पर्वतावर विविध उंचीवर उपकरणे ठेवून तापमानाचे मापन केले. या मापनानुसार प्रत्येक शंभर मीटर उंचीवर तापमानात सरासरी ०.७ अंश सेल्सियसची घट होत होती. कालांतराने जर्मन संशोधक हेल्महोल्ट्झ आणि इतर काही संशोधकांनी हे तापमान वाढत्या उंचीबरोबर कमी होत होत ३० किलोमीटर उंचीवर शून्याखाली २७३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल, असे गणित मांडले. या तापमानाला पदार्थातील अणूंची हालचाल थांबते!

उंचावरील हवेचे तापमान शोधून काढण्यासाठी गरम हवेच्या, मानवरहित फुग्यांचा वापर १८९२ साली पॅरिस येथून सुरू झाला. विविध उपकरणे बसवलेले हे फुगे पुन्हा जमिनीवर पडल्यानंतर, त्यातील उपकरणांनी नोंदवलेल्या माहितीचा अभ्यास केला जायचा. हे फुगे दहा किलोमीटरपेक्षा अधिक उंची गाठत होते. तापमानाच्या नोंदींवर सूर्यकिरणांचा परिणाम होऊ नये म्हणून ही उड्डाणे रात्री केली जायची. १८९६ साली १३-१४ नोव्हेंबरच्या रात्री पॅरिसहून केल्या गेलेल्या उड्डाणातल्या फुग्याने ११,७०० मीटर आणि १४,००० मीटर उंचीवर असताना अनुक्रमे शून्याखाली ५१ अंश व शून्याखाली ५३ अंश सेल्सियसची नोंद केली. तापमानाचे असे जवळपास स्थिर राहणे अपेक्षित नसल्याने, ही मापनातील त्रुटी असल्याचे मानले गेले. खरे तर हा एक महत्त्वाचा शोध होता! अशा प्रकारच्या नोंदी त्या काळातल्या अनेक उड्डाणांत केल्या गेल्या.

अखेर १९०२ साली फ्रान्सच्या टायसेरेन दे बोर्त याने, १८९२ सालापासून पॅरिसमधून केल्या गेलेल्या २३६ उड्डाणांतील माहितीचे विश्लेषण पॅरिसच्या फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस्कडे सादर केले. या विश्लेषणात त्याने काही (आठ ते बारा) किलोमीटरनंतर वातावरणाचे तापमान स्थिर होत असल्याचे स्पष्ट केले. स्थिर तापमानाचा हा पट्टा काही किलोमीटर जाडीचा असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली. यानंतर अल्पावधीतच जर्मनीच्या रिशार्ड अ‍ॅसमान यानेही १९०१ साली एप्रिल ते नोव्हेंबर या काळात बर्लिनहून केल्या गेलेल्या सहा उड्डाणांवर आधारलेले, अशाच प्रकारचे निष्कर्ष जाहीर केले. अ‍ॅसमानने या उंचीवर गरम वाऱ्याचे प्रवाह वाहत असण्याची शक्यता दर्शवली होती. पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याचे दर्शवणारा हा शोध हवामानशास्त्राच्या वाटचालीत महत्त्वाचा मानला गेला आहे.

 डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org