उष्ण सागरी प्रवाह शीत प्रवाहांच्या अगदी विरुद्ध असतात. विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे उष्मा आणि बाष्प वाहून नेणारे हे प्रवाह जगातील सर्व महासागरांमध्ये आढळतात. उष्ण पाण्याची घनता कमी असल्याने बहुतेक सर्व उष्ण प्रवाह पृष्ठभागाजवळ वाहतात. उष्ण प्रवाहांमुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये हवा उबदार होते व हिवाळय़ाची तीव्रता कमी जाणवते. नॉर्वे, फिनलँड, कॅनडा आदी देशांच्या गोठलेल्या बंदरांमधील बर्फ उष्ण प्रवाहांमुळे वितळते आणि जहाजे आतपर्यंत पोहोचू शकतात.
अमेरिका आणि कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ ‘गल्फ प्रवाह’ वाहतो. त्या प्रवाहाद्वारे मेक्सिकोच्या आखातातून येणारे उबदार पाणी पूर्व किनारपट्टीवरील हवामान उबदार ठेवते. याच ‘गल्फ प्रवाहा’ची एक शाखा पश्चिम युरोपपर्यंत पोहोचते. त्यामुळे या भागांमधील हवामान इतर भागांपेक्षा उबदार राहते. अटलांटिक महासागरामध्ये विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेला अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, हे दोन उष्ण प्रवाह वाहतात. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावांमुळे हे प्रवाह पश्चिमेकडे वाहतात. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाची एक शाखा असलेला ‘ब्राझील प्रवाह’ दक्षिण अमेरिकेच्या पूर्वकिनारपट्टीलगत वाहतो व उबदार पाणी दक्षिण ध्रुवाकडे पोहोचवून थंडीचा कडाका कमी करतो. कॅनडाच्या पश्चिमेला वाहणारा ‘अलास्का प्रवाह’देखील अशाच प्रकारे बर्फाळ हवामानाचा प्रभाव कमी करतो.
‘गल्फ प्रवाहा’शी समांतर प्रशांत महासागरातील ‘कुरोसिवो’ हा प्रमुख उष्ण प्रवाह बाष्प आणि उष्ण पाणी ध्रुवाकडे वाहून आणतो. कुरोसिवो प्रवाहामुळे जपानच्या किनाऱ्यावर पाऊस आणि बर्फवृष्टी होते. तसेच कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन चक्रीवादळे उद्भवतात. जगातील सर्वात उत्तरेकडील प्रवाळभित्ती जपानजवळ आढळतात. कुरोसिवो प्रवाहाचे उबदार पाणी त्यांच्या वाढीसाठी मदत करते. याशिवाय अटलांटिक महासागरामध्ये विषुववृत्तीय प्रतिप्रवाह, अँटिलीस आणि नॉर्वेजिअन प्रवाह, तर हिंदी महासागरात अगुलहास, मोझाम्बिक, सोमाली आणि र्नैऋत्य मोसमी प्रवाह हे प्रमुख उष्ण प्रवाह कार्यरत असतात. सोमाली आणि र्नैऋत्य मोसमी प्रवाह भारतीय उपखंडातील मोसमी पाऊस नियंत्रित करतात. अर्थातच याचा परिणाम शेती आणि मासेमारीवर दिसून येतो. शिवाय सोमाली प्रवाहामुळे पाण्याचे अभिसरण होऊन पावसाळय़ात भारताच्या किनारपट्टीवर माशांची पैदास वाढते.
पृथ्वीवरील हे वाहक-पट्टे पर्जन्यमान आणि हिमवृष्टीवर परिणाम करतात. शिवाय पाण्याचे तापमान संतुलित राखून सागरी प्रवाह सूक्ष्मजीव, प्लवक आणि सागरी जीवांच्या वाढीस मदत करतात. सागरी प्रवाहांचा परिणाम जलवाहतुकीवरही होतो. जागतिक तापमानवाढीमुळे मात्र या प्रवाहांच्या नियमिततेत बदल होत आहेत.
– अदिती जोगळेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org