अन्न ही आपली  मूलभूत गरज. त्यासाठी लागणाऱ्या ‘वॉटर फुटप्रिंट’चा  अर्थात पाण्याच्या पाऊलखुणांचा विचार करू या..

शाकाहारी जेवणाचे उदाहरण घेऊ. जेवणाच्या ताटातील अन्नधान्य शेतात पेरल्यापासून आपल्या ताटात येईपर्यंतच्या प्रवासात किती पाण्याची गरज असते, याचे अंदाजे आकडे इथे लिटर या एककात दिले आहेत : एक वाटी भात- ३५०; एक वाटी वरण- १००; दोन भाज्या- ६०; दोन पोळ्या- ११०; कोशिंबीर- १००; एकूण ७२० लिटर पाणी!

मांसाहारी जेवणाचे ताट असेल तर वॉटर फुटप्रिंटचा आकडा साधारणपणे दुप्पट होतो. याचे कारण जाणून घेण्यासाठी पर्यावरणातील अन्नस्तूपाकडे पाहावे लागेल. या स्तूपामध्ये सर्वप्रथम उत्पादक म्हणजे वनस्पती असतात. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांचा क्रम लागतो. शाकाहारी प्राण्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. प्राथमिक भक्षकांवर उपजीविका करणारे द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षकाच्या वॉटर फुटप्रिंट वापरामध्ये त्याने ज्या सेवन केलेल्या प्राण्याच्या पाणीवापराची भर पडते. परिणामी मांसाहारी जेवणाच्या ताटातील वॉटर फुटप्रिंटचा आकडा जास्त होतो.

कडधान्ये, धान्ये, तेलबिया यांत अनुक्रमे प्रथिने, कबरेदके, स्निग्ध पदार्थ असतात. ते आपल्या आहारातील आवश्यक घटक आहेत. हे तिन्ही घटक वनस्पतीजन्य तसेच प्राणिजन्य  पदार्थापासून प्राप्त होतात. मात्र या वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य पदार्थाच्या वॉटर फुटप्रिंटमध्येही फरक आहे. एक ग्रॅम प्रथिने मिळवण्यासाठी वनस्पतीजन्य पदार्थाना जेवढे पाणी लागते त्याच्या दीडपट पाणी दूध, अंडी या प्राणिजन्य पदार्थासाठी लागते. कबरेदकांचा विचार केल्यास, प्राणिजन्य पदार्थाना वनस्पतीजन्य पदार्थापेक्षा १२ पट अधिक पाण्याची गरज असते. घरी तयार केलेले अन्नपदार्थ आणि कारखान्यात तयार केलेले खाद्यपदार्थ यांची तुलना केली, तर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचे वॉटर फुटप्रिंट जास्त असतात.

एक लिटर नळाचे पाणी घेतले तर वॉटर फुटप्रिंट संख्या एक लिटर,  बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद पाण्यासाठी पाच लिटर पाण्याची गरज असते. एक संत्रे पिकवण्यासाठी साधारण ५० मिलीलिटर पाणी लागते, परंतु ताज्या संत्र्याच्या रसासाठी १५० मिलीलिटर पाणी लागते. एका ब्रेडच्या फाकीसाठी अप्रत्यक्ष ८० लिटर पाणी लागते, तर एक पोळी तयार करण्यासाठी ५५ लिटर पाणी लागते!

हे ध्यानात घेता, पाणी बचतीच्या वेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.

– सुचेता भिडे 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org