छायाचित्र नसल्याने नावे वगळली; जिल्हाव्यापी मोहिमेत हजारो मतदारांची छायाचित्रे जमा

पालघर : जिल्ह्यतील सहा विधानसभा मतदारसंघातील २०.४४ लक्ष मतदारांपैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचा विशेष कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाने हाती घेतला असून अजूनपर्यंत ७१ हजार ५६१ मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नालासोपारा मतदारसंघातील ४३ हजार मतदारांची छाननी व नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू असून छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा उद्दिष्ट जिल्हा निवडणूक विभागाने ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यामध्ये २० लाख ४४ हजार २८९ मतदारसंख्या असून त्यापैकी एक लाख २१ हजार ४८१ मतदारांची छायाचित्रे मतदार यादी नसल्याचे निष्पन्न झाले होते. सुमारे सहा टक्के छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संग्रहित करण्याची विशेष मोहीम मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) स्तरावर हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत आजवर ७०४६ छायाचित्र संग्रहित करण्यात आले असून ७१ हजार ५६१ छायाचित्र नसलेली नावे वगळण्यात आली आहेत.

सद्य:स्थितीत नालासोपारा मतदारसंघातील ४२ हजार ८७४ छायाचित्रे नसलेल्या मतदारांची पडताळणी सुरू असून त्यांची नावे वगळण्यासाठी शासनाने नमूद केलेली प्रक्रिया व योग्य प्रसिद्धी देऊन करण्याचे हाती घेण्यात येत आहे. सध्याच्या करोना परिस्थितीत हे काम करण्यास मर्यादा येत असल्या तरीही जिल्ह्यतील छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे यांनी सांगितले.

मतदार याद्यांची पडताळणी करून संपूर्ण यादी छायाचित्रांसह सुसज्ज करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मतदार याद्यांचे नूतनीकरण करण्यासाठी १ जूनपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर किंवा परिसरात जाऊन त्यांचे फोटो संकलित करणे, मतदार प्रत्यक्षात राहत नसल्यास परिसरातील व्यक्तींचा जाबजबाब नोंदवून घेणे,  छायाचित्र जमा करण्यासाठी सूचना फलकांवर आवाहन करणे तसेच वृत्तपत्रांमध्ये किंवा अन्य माध्यमांतून वगळण्यात येणाऱ्या नावांची माहिती प्रसिद्ध करणे अशी प्रक्रिया राबवली जात आहे.

मतदार याद्या अद्ययावत करण्यात जिल्ह्यतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी नमूद केले असून जिल्ह्यच्या याद्या १५ ऑगस्ट पूर्वी अद्ययावत होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 thousand voters no photographs palghar ssh