पर्ससीन नौकांवरील कारवाईत मत्स्यव्यवसाय विभागाची चालढकल
पालघर : पालघरच्या मत्स्यव्यवसाय विभागाने अलीकडेच पर्ससीन नौकेवर कारवाई करून जप्त केलेल्या व त्याचा लिलाव केलेल्या माशांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मच्छीमार संस्थांमार्फत पुढे येत आहे. कारवाईमधील नौकेत असलेल्या माशांतील कमी मासे जप्त केल्याचेही सांगितले जाते. या आरोपाचे खंडन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. पर्ससीन ट्रॉलर्सच्या मालकाचा लाखो रुपयांचा दंड वाचविण्यासाठी पालघर मत्स्यव्यवसाय विभाग प्रयत्नशील असल्याचे आरोप केले गेले आहेत. डहाणूच्या समुद्रात १६ डिसेंबर रोजी राज्य मासेमारी हद्दीत बेकायदा मासेमारी पर्ससीन नौकेवर कारवाई केली.
पन्नास दाढे मासे कारवाईत जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या माशांचा लिलाव मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी या लिलावात माशांना दोन लाख तीस हजार रुपये इतकीच किंमत मिळाली आहे. प्रत्यक्षात माशासह माशाच्या बोतीला (पोटातील विशिष्ट अवयव) सुमारे दहा लाख रुपये किंमत मिळणे आवश्यक होते. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लिलावासाठी घाई करत ते कमी किमतीत विकल्याचे आरोप केले जात आहेत. पर्ससीन नौकांना कारवाईतून अभय मिळण्यासाठी त्या नौकेवरील उपलब्ध माशांपैकी कमी मासे जप्त करून कारवाई केल्याचा फार्स मत्स्यव्यवसाय विभाग करत असल्याचा आरोपही मच्छीमार संस्था करत आहेत.
दोषींवर कारवाईसाठी लेखी तक्रार
ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, ज्योती मेहेर, जयवंत तांडेल आदींनी प्रभारी मत्स्यव्यवसाय आयुक्त पंकज कुमार यांच्याकडे या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार केली आहे.
प्रत्यक्षात पर्ससीन नौकेवरील मासे कमी प्रमाणात जप्त केले गेले. त्यातही लिलाव नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आमचा आरोप आहे.
– जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संस्था
लिलाव करताना तो शंभर ते सव्वाशे मच्छीमारांसमोर केला गेला त्याचे चित्रीकरण उपलब्ध आहे. स्थानिक मच्छीमार आणि त्यांच्या आवाक्यानुसार लावलेल्या बोलीतून जाहीर लिलावाच्या अंतिम रकमेमध्ये तो मान्य करून विक्री केला गेला. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
– आनंद पालव, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त, ठाणे-पालघर