पालघर: पालघर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या महिला व बाल सक्षमीकरण व सर्व समावेशक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास भवन उभारण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. या कामी पालघर जिल्ह्यातील भवनासाठी पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये पालघर येथे झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत महिला व बालविकास भवनासाठी जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता. या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांनी महिला व बाल विकास भवनासाठी पाच एकर जागेची मंजुरी केली असून अमरावती पॅटर्नप्रमाणे या भवनाचे बांधकाम करण्यात यावे, असे शासनाने अलीकडेच आदेश काढले आहेत. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महिला व बाल विकास भवनाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीला नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान तीन टक्के निधी या विभागासाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने ३१ जानेवारी रोजी काढले आहेत. यानुसार महिला सबलीकरण व बालकांचा विकास साधण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे. या निधीमधून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनादेखील राबवण्यात येणार आहेत. महिला व बाल विकास भवनाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हाती घेण्यात येणार असून त्याला जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देणार आहेत. जिल्हा नियोजनमधील राखीव निधीचा याकामी उपयोग होणार असल्याने भवनाची उभारणी शीघ्र गतीने होऊ शकेल, अशी महिला बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे यांनी आशा व्यक्त केली.
