डहाणू : डहाणू तालुक्यातील डहाणू खाडी येथील एका तरुणाने घरी झालेल्या किरकोळ वादातून समुद्र खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी तरुणाने समुद्रात उडी मारली असून त्याचा मृतदेह रविवार २८ सप्टेंबर रोजी चिंचपाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला.

अविनाश मच्छी (२६) हा तरुण शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात घरातून निघाला होता. तो परतला नसून त्याची दुचाकी डहाणू खाडी पुलावर आढळून आली. त्यानंतर कुटुंबाने पोलिसात धाव घेतली असून त्याचा शोध सुरू केला. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली की तो कुठे निघून गेला याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी कसून शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नाही.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास डहाणू खाडी येथील चिंचपाडा परिसरात अविनाशचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी वाणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.