वाडा: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओबीसींनी वाडा तहसीलदार कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. पाच हजारांहून अधिक ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी वाडा-भिवंडी-मनोर मार्गावरील खंडेश्वरी नाक्यावरच शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे  मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह पेसा क्षेत्रातील नोकरींमधील १०० टक्के आरक्षण रद्द करावे, जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओबीसींवर कशा प्रकारचा अन्याय सुरू आहे, त्यांचे आरक्षण कसे कमी करण्यास लावले आहे, पेसामुळे  या भागातील ओबीसी समाजातील स्थानिक सुशिक्षित तरुण, तरुणी नोकरीपासून कसा वंचित राहिला आहे याबाबत मोर्चातील एका तरुणाने व तरुणीने मार्गदर्शन करून यापुढे ओबीसींच्या प्रत्येक आंदोलनात ओबीसी तरुण पुढे असेल याची ग्वाही दिली. राजकीय पक्ष, संघटना विरहित झालेल्या या मोर्चासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कुठलाच पक्षाचा पुढारी, कार्यकर्ता निमंत्रित  नव्हता. न्याय मिळेपर्यंत हा लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. मोर्चा वाडा तहसीलदार कार्यालयावर गेल्यानंतर शिष्टमंडळाने  मागण्यांचे निवेदन वाडा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstration of strength of obcs in palghar district ysh