पालघर : स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन आगाऊ देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरीही पालघर नगर परिषदेचे ५२ कर्मचारी या सवलतीपासून वंचित राहिले आहेत.  कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी उशिरा झाल्याने बोनसची रक्कम दिवाळी सरल्यानंतर होईल अशी चिन्ह आहेत. त्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी आगाऊ स्वरूपात करण्याचा निर्णय झाला असला तरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आगाऊ वेतनाची रक्कम स्टेट बँकेतून बँक ऑफ महाराष्ट्र येथे वर्गवारी होण्यास विलंब झाल्याने ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही. ही रक्कम मंगळवारी जमा होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

या विषयी पालघर नगर परिषदेच्या लेखा विभागाशी संपर्क साधला असता स्टेट बँकेतून आगाऊ वेतनाची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वर्ग करण्यासाठी बँकेच्या वेळेत आरटीजीएससाठी आवश्यक धनादेश व इतर कागदपत्र देण्यात आली होती. तसेच त्या व्यवहारासाठी आपल्याला यूटीआर नंबरदेखील प्राप्त झाला असल्याचे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले. तरी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे स्टेट बँकेकडून येणारा निधी बँक ऑफ महाराष्ट्रला उशिरा प्राप्त झाला की बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास दिरंगाई झाली याचे कारण बँकांना सुट्टी असल्यामुळे सांगता येणार नाही, असेही नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले.

बोनस दिवाळीनंतर

पालघर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना २३ व २५ हजार रुपयांचे बोनस रक्कम मिळावी असे प्रस्तावित होते. मात्र शुक्रवारी (ता २१) सायंकाळी झालेल्या नगर परिषदेच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना १२ हजार व अधिकाऱ्यांना १५ हजार रुपये बोनसबाबत निर्णय झाला. त्यानंतर बोनसला मान्यता देणारा ठरावाला मंजुरी देणे व तसेच तो कायम करून त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास दिवाळी विसरल्यानंतरच होईल, असे सांगण्यात आले.

नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी

पालघर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डहाणूचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे होता. वसई-विरार महानगरपालिकेत साहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असणारे डॉ. पंकज पवार पाटील यांनी १८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बँकेत स्वाक्षरी बदलण्याचा प्रक्रिया पुढील काही दिवसांत करण्यात आली. मात्र आगाऊ पगार व बोनसविषयी नगर परिषदेचा निर्णय वेळेत न झाल्याने त्याचा परिणाम पैसे जमा न होण्यात झाल्याचे दिसून आले आहे.