हॉटेलच्या पोहोच रस्त्यासाठी गौणखनिजांचा वापर
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत होणाऱ्या बेकायदा उत्खननात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. महामार्गावरील एका हॉटेलच्या पोहोच रस्त्यासाठी या उत्खननातील गौण खनिजाचा वापर करण्यात येत आहे. वन खात्याकडून सीमानिश्चिती न करताच साडेसहा एकर क्षेत्रात काम सुरू असल्याने खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत डोंगर जमीनदोस्त करून पर्यावरणाचा ऱ्हास करून आदिवासींच्या नावे हॉटेल बांधकाम करून जमिनी सपाटीकरण व पोहोच रस्त्यासाठी कोटय़वधीचे स्वामित्व धन बुडवण्यात वाडा खडाकोना, सोमटा, नांदगाव, हलोली ही महसुली गावे आघाडीवर आहेत. डहाणू, तलासरी तालुक्यात नियमबाह्य पद्धतीने मोठया संख्येने दगडखाणी वन विभागाच्या हददीत डोंगरदऱ्यांत उत्खनन केले जात आहे. महसूल आणि वनअधिकारी यांच्या बेफिफिरीमुळे वाडा खडकोना या परिसरातील लहान-मोठे डोंगर, टेकडया उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. जमिनी सपाटीकरणाच्या नावाखाली वन विभागातून बेसुमार माती उत्खनन, वृक्षांची कत्तल करून नैसर्गिक स्रोत बुजवण्याचे उद्योग सुरूच आहे.
डहाणू, तलासरी, पालघर या तालुक्यात महामार्गालतच्या हॉटेलच्या सपाटीकरणासाठी तसेच भरावासाठी तालुक्यातील जमिनी लक्ष्य करून संपादित केल्या जात आहेत. उत्खननाविषयक नियमांची पायमल्ली होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत महसूल अधिकऱ्यांना विचारले असता या परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयातून काढल्याचे सांगितले जाते. मात्र परवाने न तपासता होणाऱ्या बेसुमार खोदकामाकडे मात्र रीतसर दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत बोईसर मंडळ अधिकारी मुकेश वर्तक यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.
स्वामित्व धन बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या परवानग्यांकडे शासनाच्या पर्यावरण खात्याने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
-कुंदन राऊत, पर्यावरणप्रेमी
