वाडा : वाडा तालुक्यात जनावरांमध्ये खुरी रोगाची लागण झाल्यानंतर लाळ्या- खुरकत रोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. “लोकसत्ता”च्या वृत्तानंतर पशुसंवर्धन विभागाला जाग आली असुन पालघर जिल्हा पशुसंवर्धन चिकित्सालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. शिल्पा कारगिलवार यांच्या उपस्थितीत नेहरोली येथून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळी पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

वाडा तालुक्यातील मालोंडे, नेहरोली, चिखले, कोने या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी पशुपालकांकडील १५ ते २० जनावरांच्या खुरांमध्ये जखमा झाल्याने जनावरे लंगडत असल्याचे आढळून आले होते. या जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून उपचार मिळाले नव्हते तसेच पावसाळ्यापूर्वी लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण झाले नसल्याची पशुपालकांची तक्रार होती.
(पशुपालकांकडून आरोप करण्यात आला होता.)

खुरी रोगाची लागण झालेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुपालकांना खाजगी पशुवैद्यकांचा आधार घेण्याची वेळ आली होती, शिवाय उपचार हे खर्चिक असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबत १५ ऑगस्ट रोजी”लोकसत्ता”मध्ये “जनावरांना खुरी रोगाची लागण” वाडा तालुक्यातील पशुपालक चिंतेत” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी गंभीर दखल घेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी खानिवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन आढावा घेतला होता.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांच्या आदेशानुसार वाडा तालुक्यातील खुरी रोगांचा संसर्ग झालेल्या जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच लाळ्या- खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. वाडा तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार २२,०७४ गोवर्गीय तसेच १०,९१८ म्हैस वर्गीय असे एकूण ३२,९९२ एवढे पशुधन आहे.

पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून

फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये, लाळ्या- खुरकूत, घटसर्प, फऱ्या, लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचा अहवाल दिला आहे. मात्र प्रत्यक्षात वाडा तालुक्यातील अनेक गावांतील पशुपालकांना पर्यंत हे लसीकरण पावसाळ्यापूर्वी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वाडा लघु पशु सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी लंगडणाऱ्या जनावरांवर उपचार करण्यात येत असून त्यातील काही जनावरे बरी होत असल्याचे सांगितले. तर डॉ.शिल्पा कारगिलवार यांनी अचूक रोग निदानासाठी जनावरांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

“लाळ्या – खुरकूत” रोगाच्या लसीकरणाचे आवाहन

दरम्यान, लाळ्या – खुरकूत लसीकरण मोहिमेला नुकतीच १५ ऑगस्ट पासुन सुरुवात केली असुन ती २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार असल्याने पशुपालकांनी जनावरांचे लाळ्या- खुरकूत रोगाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून केले आहे.