वाडा :वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती विवाह लावून त्यांची काही रक्कमेत विक्री तसेच लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेबद्दल मोठा संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या घडलेल्या घटनेबद्दल वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास व प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. अशी माहिती वाडा पोलिसांनी दिली आहे.विशेष म्हणजे कातकरी समाजातील मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावले आहे. यासाठी अल्पवयीन मुलीला सासरच्यांकडून अवघ्या ५० हजारांची रोख रक्कमेत विकत घेण्याचा हा प्रकार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेकडून देण्यात आली आहे.
फिर्यादी अल्पवयीन पीडित १७ वर्षांची असुन ती वाडा तालुक्यातील परळी येथील आहे. तिने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न केवळ १४ वर्षांचे असताना अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील जीवन बाळासाहेब गाडे याच्यासोबत जबरदस्ती करण्यात आले. लग्नासाठी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सासर मंडळीकडून धमक्या देण्यात येवून ५० हजार रुपयांची रोख मध्यस्थामार्फत देवाणघेवाण करीत विक्री झाली आहे.पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न २०२२ मध्ये झाले असून लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत चालला होता, मात्र २०२३ मध्ये पीडितेला (अल्पवयीन मुलीला) जबरदस्तीने गरोदर केले गेले.
तसेच पती व सासरच्या मंडळींकडून सतत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला होता. काही महिन्यानंतर मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता अधिक वाढली. पतीने पीडितेला सांगितले – “तुझे लग्न मी ५० हजार रुपये देऊन विकत आणले आहे.” यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून जन्मतारीख बदलली, मूळ जन्मतारीख १०/१०/२००८ असून पतीने ती वैद्यकीय तपासणीमध्ये पत्नी अल्पवयीन दिसून येवू नये म्हणून बनावट पद्धतीने वय वाढविण्यासाठी २०/१०/२००३ अशी करून घेतली. दरम्यान, हा प्रकार श्रमजीवी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये जीवन बाळासाहेब गाडे (पती), अमोल गाडे (चुलत सासरे), बाळासाहेब गाडे (सासरे), दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे. यातील पीडितेचा पती जीवन बाळासाहेब गाडे आणि मध्यस्थी करणारे आरोपी रवि कृष्णा कोर (ता.वाडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात ०२ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा रजि. क्र. 394/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(एन), ३७०, ४६८, ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ आणि पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा तपास पालघर पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. महेर य वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे हे तपास करत आहेत.
श्रमजीवी संघटना आक्रमक
वाडा तालुक्यातील परळी येथील अल्पवयीन मुलीच्या लग्नाबाबत आर्थिक देवाणघेवाण प्रकारासारखा असाच दुसरा प्रकारही श्रमजीवी संघटनेच्या तपासात उघडकीस आला आहे.वाडा तालुक्यातील बुधावली (कातकरी वाडी) येथील अजून चार मुलींची अकोले भागात मुलींच्या कुटुंबियांना पैशांचे आमिष देत १ लाख ते सव्वा लाख (१.२५) रुपये घेऊन लग्न लावून विक्री केली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान वाडा तालुक्यात घडलेल्या या गंभीर घटनेवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चिटणीस विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी माहिती मिळताच आवाज उठवला.संघटनेचे भरत जाधव तालुका अध्यक्ष, सुरज दळवी तालुका सचिव, रेखा पऱ्हाड महिला संघटक, सुजाता पारधी ता.उपाध्यक्ष, मोतीराम वारे ता.उपाध्यक्ष यांनी हा प्रकार उजेडात आणला.
माहितीनुसार ही घटना दाबून ठेवण्याचा विविध स्तरावर जोमाने प्रयत्न झाले परंतु संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आदिम जमातीतली कातकरी समाजाची परिस्थिती कर्जबाजारी व दारिद्र्याने पिचलेली आहे. अशा परिस्थितीत, दलालांच्या मार्फत अल्पवयीन मुलींची विक्री वाढत चालली आहे. संघटनेने जिल्हा प्रशासनाने ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व PESA मोबिलायझर यांच्यामार्फत माहिती घेऊन संबंधित दलालांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे; अन्यथा श्रमजीवी संघटना सामाजिक प्रश्नावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिला आहे.