डहाणू : डहाणू तालुक्यातील नरपड भागात बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार ८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास नरपड येथील कल्पेश पाटील यांच्या वाडीत शिरून बिबट्याने वासराला लक्ष्य केले. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. बिबट्या मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीही बिबट्याने कोंबड्या, कुत्रे, वासरे, बकरी यांसारख्या लहान प्राण्यांना लक्ष्य केले असून तलासरी तालुक्यातील आंबेसरी भागात एक महिला आणि एका पुरुषावर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. दोन वर्षांपूर्वी नरपड येथे एका म्हशीच्या वासराला बिबट्याने लक्ष्य केले होते. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वनविभागाकडून हल्ल्यात जखमी नागरिकांना आणि पशू पालकांना भरपाई देण्यात येते. मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अथवा त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे समोर येत आहे. सध्या वनविभागाकडून परिसरात जनजागृती करून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. मात्र, वन विभागाने बिबट्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वन्यप्राणी मानवी वस्तीकडे का येतात?
डहाणू परिसरात वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले वाढले असून, बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर चिंतेचा विषय बनला आहे. जंगलतोड आणि मानवी अतिक्रमण यामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. जंगलातील भक्ष्य कमी झाल्यामुळे आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यांना कोंबड्या, कुत्रे, वासरे, बकरी यांसारखे सहज भक्ष्य इथे मिळते. काही वेळेस वन्यजीवांची संख्या वाढल्यामुळेही त्यांच्यात अधिवासासाठी स्पर्धा वाढल्यामुळे ते मानवी वस्तीकडे वळत असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मानवी वस्तीत रात्री पाळीव प्राण्यांना मोकळे सोडणे किंवा कचरा उघड्यावर टाकणे यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे आकर्षित होत आहेत. या गंभीर समस्येवर वन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नरपड येथील घटनेनंतर घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे. बिबट्याच्या शोधासाठी इथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. – अशोक उतेकर, वनविभाग डहाणू