आठवडाभरात २१ लोकांना चावा
वाडा : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १० ते १२ हजार लोकवस्ती असलेल्या कुडूस येथील नागरिक सध्या भटक्या श्वानांच्या दहशतीने त्रस्त झाले आहेत. या आठवडाभरात २१ लोकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. आठवडाभरात एकवीस जणांना चावा घेतला असतानादेखील येथील ग्रामपंचायतीला या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. येथील बाजारपेठेत शेकडो भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला असल्याने नागरिकांना बाजारहाट करण्यासाठी घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
कुडूस येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात मोठय़ा प्रमाणावर ओली व सुक्या मासळीची विक्री होत असते. या मासळीचे तुकडे किंवा अन्य शिल्लक राहिलेले भाग खाण्यासाठी कुडूस परिसरातून शेकडो भटके श्वान या ठिकाणी येत असतात. आठवडाभरात या भटक्या श्वानांनी कुडूस व वडवली या दोन्ही गावांतील लहान- मोठय़ा अशा २१ व्यक्तींना चावा घेतला आहे. यामधील काही जखमींवर कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर सोडून दिले असे कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी समाधान पगारे यांनी सांगितले. तर काहींना पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे.
चावे घेणारे काही कुत्रे पिसाळलेले असावेत असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. श्वानांच्या चाव्यांमुळे जास्त जखमी झालेले इब्राहिम अन्सारी (२ वर्षे, रा. वडवली), आनंद मंडळ (५ वर्षे, वडवली), सुनीता बोवर, वेदार्थ पाटील (८ वर्षे, मुसारणे) या बालकांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे.