पालघर : जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत प्रस्तावित असलेल्या जेएसडब्ल्यू मुरबे पोर्टची (मुरबे बंदर) जनसुनावणी उद्या, ६ ऑक्टोबर रोजी पालघर खारेकुरण रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीला किनाऱ्यालगतच्या गावांच्या नागरिकांनी दर्शविलेल्या विरोधामुळे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालघर पोलीस दलाने जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या या जाहीर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुरबे बंदरामुळे सातपाटी आणि मुरबे गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरून गावकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि पारंपारिक मासेमारीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सातपाटीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी आपली मते, निवेदने आणि अडचणी शांततेत मांडावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी करण्यात आलेला बंदोबस्त
पालघर पोलीस दलामार्फत या जनसुनावणीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तामध्ये १२४ पोलीस अधिकारी आणि १०६९ पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ८ स्ट्रायकिंग पथके, १ एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल), २ आरसीपी, आणि २ जलद प्रतिसाद पथक देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे ३ अधिकारी व ३२ अंमलदार नेमण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून शांततेत सहभाग घ्यावा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास पोलीस दलास सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस दलाकडून करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे