बोईसर रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहनचालक त्रस्त ; वाहतूक कोंडी आणि अपघात

मोकाट गुरांना बेशुद्ध करून त्यांची कत्तलखान्यात विक्री करण्यासाठी या भागात अनेक टोळय़ा सक्रिय आहेत.

बोईसर रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहनचालक त्रस्त ; वाहतूक कोंडी आणि अपघात
औद्योगिक नगरी तारापूर-बोईसर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.

बोईसर : औद्योगिक नगरी तारापूर-बोईसर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. ही  गुरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदैव अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.

बोईसर ते चिल्हार फाटा या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आलेले असून या मार्गावरील नागझरी नाका, गुंदले आणि मान या गाव हद्दीत रोज दिवस-रात्र १५-२० गुरांचे कळप बरोबर रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून  बसलेले असतात.

यामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मालाची वाहतूक करणारी अवजड मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच कामावर ये-जा करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून आपल्या दुचाकी चालवाव्या लागत आहेत. यामुळे या मार्गावर आतापर्यंत विशेषत: रात्रीच्या वेळेस जनावरांवर धडकून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात जनावरांसोबत माणसांचेदेखील जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे तर काही जणांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत.

पूर्वी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात कोंडवाडय़ांची व्यवस्था होती. मात्र सध्या या कोंडवाडय़ांची दुरवस्था झाल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना ठेवायचे कुठं असा प्रश्न स्थानिक ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे. 

मोकाट गुरांना बेशुद्ध करून त्यांची कत्तलखान्यात विक्री करण्यासाठी या भागात अनेक टोळय़ा सक्रिय आहेत. काही प्राणीप्रेमी नागरिक जखमी आणि आजारी गुरांवर वैद्याकीय उपचार करून त्यांची व्यवस्था गोशाळेत करतात मात्र त्यांनाही मर्यादा असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.

स्थानिक ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि  पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Motorists suffer due to stray cattle on boisar road zws

Next Story
पालघर प्रगतिशील जिल्हा होणार ; स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळय़ात जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास
फोटो गॅलरी