पालघर : वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने पालघर जिल्ह्यात धडक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आकडा टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून धोकादायक मार्गाने वीज चोरणाऱ्या तब्बल ३११ ग्राहकांना गेल्या पाच महिन्यांत रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यांच्या काळात या ग्राहकांकडून ५३.३६ लाख रुपयांचे वीज देयक (दंड) आकारण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामीण, डहाणू, जव्हार, पालघर, सफाळा, तलासरी आणि विक्रमगड या भागांमध्ये वीज चोरीची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणने कारवाई केलेल्या ३११ वीजचोरांना एकूण ५३.३६ लाख रुपयांचे देयक (दंड) देण्यात आले आहे. यापैकी १५२ ग्राहकांनी सुमारे ३६.२७ लाख रुपये दंड भरला आहे. उर्वरित १८२ ग्राहकांनी अद्याप दंड आणि वीज बिल भरलेले नाही. या ग्राहकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो असे देखील महावितरण ने सांगितले आहे त्यामुळे या ग्राहकांनी लवकरात लवकर विज बिल भरणे आवश्यक आहे.
जे ग्राहक दंड भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर महावितरणच्या फिर्यादीनुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रिया जलदगतीने सुरू झाली आहे. महावितरणने पालघर जिल्ह्यातील जवळपास चार लाख वीज ग्राहकांना सुरक्षित आणि सुरळीत विद्युतपुरवठा देण्यासाठी वीज चोरीविरोधातील ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अनधिकृत वीज वापर टाळून अधिकृत मीटरद्वारेच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. यासह दंड न भरणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल व ग्राहकांनी ही कटू कारवाई टाळण्यासाठी त्वरित थकीत देयके भरावीत असे आवाहन करण्यात आल्याने
वीज चोरीचे धोकादायक प्रकार
वीजबिल कमी करण्याच्या लोभापायी काही ग्राहक मुख्य वाहिनीवर थेट आकडा टाकून किंवा विद्युत मीटरमध्ये ‘इलेक्ट्रिकल रेझिस्टर’ (विद्युत विरोधक) टाकून वीज प्रवाह कमी करतात. महावितरणने सुरू केलेल्या शोध मोहिमेत अभियांत्रिकी पथकाद्वारे तसेच फिरत्या पथकाद्वारे या चोऱ्या उघडकीस आणल्या जात आहेत.
शिक्षा आणि दंडाची तरतूद
वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरण दंडात्मक कारवाईसह पोलिसांत गुन्हा दाखल करते.
विद्युत कायदा २००३, कलम १३५: मीटरमध्ये छेडछाड केल्यास तीन वर्षांची शिक्षा व दंड आकारला जातो.
विद्युत कायदा २००३, कलम १२६: घरगुती मीटरचा वापर औद्योगिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी केल्यास दुप्पट दंड भरावा लागतो.
वीज चोरी हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तो जीवघेणा धोकादायक प्रकार आहे. मागील वर्षी वीज चोरीदरम्यान पाच-सहा अपघात झाले होते. कोणताही ग्राहक सुरक्षित विद्युत पुरवठ्याऐवजी हा धोकादायक मार्ग अवलंबू नये.- सुनील भारंबे, कार्यकारी अभियंता, महावितरण