mumbai metropolitan region extended to vasai and palghar taluka zws 70 | Loksatta

मुंबई महानगर क्षेत्र गुजरातपर्यंत? ; डहाणू, तलासरीचा भागही ‘एमएमआर’अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव

तलासरी तालुका दुर्गम असून या तालुक्यात रेल्वेची थेट जोडली नसल्याने तालुक्याचा विकास खुंटला आहे.

मुंबई महानगर क्षेत्र गुजरातपर्यंत? ; डहाणू, तलासरीचा भागही ‘एमएमआर’अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव
(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर: मुंबई महानगर क्षेत्र अर्थात एमएमआर पालघर जिल्ह्यातील वसई व पालघर तालुक्यांपर्यंत विस्तारित करण्यात आला असून या क्षेत्राचा विस्तार करून वाडा, डहाणू व तलासरी तालुक्यात करण्याबाबत विचाराधीन आहेत. याबाबत निर्णय झाल्यास आदिवासी बहुल भागाचा विकास साधण्यास शक्य होण्यासोबत मुंबई महानगर क्षेत्र गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत विस्तारित होईल. वाढावण बंदर प्रकल्पाला स्थानीय पातळीवर विरोध होत असताना केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प रेटून नेण्याच्या प्रयत्नात ‘एमएमआर’ क्षेत्राचे सीमोल्लंघन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्राची हद्द बरीच वर्षे वसई तालुक्यापर्यंत मर्यादित होती. पुढे ते पालघर शहराच्या हद्दीपर्यंत व नंतर संपूर्ण पालघर तालुक्यापर्यंत विस्तारित करण्यात आले होते. आता डहाणू, तलासरी व वाडा या तालुक्यांना एमएमआरमध्ये समाविष्ट करण्याच्या राज्य सरकार विचाराधीन आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रात डहाणू, तलासरी परिसरांचा समावेश करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. तसेच पालघरसह वाडा व डहाणू तालुक्यांना जोडणाऱ्या विक्रमगड तालुक्याचा या हद्दविस्तारात विचारदेखील करावा, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केल्याचे समजते. या प्रस्तावाबाबत जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिप्राय राज्य सरकारकडे पाठवला असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांकडून समजते.

पायाभूत सुविधा उपलब्ध

मुंबई महानगर क्षेत्राच्या (एमएमआर) विस्तारीकरणाला मान्यता मिळाल्यास मुंबईपासून थेट गुजरात राज्यापर्यंतचा सलग पट्टय़ाचा विकास होऊन नागरीकरणाला चालना मिळू शकेल. तसेच वाढवण बंदरासह इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील. याच दृष्टिकोनातून राज्य सरकार विचार करीत असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विस्तार का हवा?

वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण व नागरीकरण झाले असून मनोर- वाडा- भिवंडी रस्त्याची अवस्था बिकट आहे. वाडा परिसरात मोठय़ा प्रमाणात भातशेती व फळशेती केली जात असून शेतमाल वाहतुकीसाठीदेखील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावल्यास तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांना मदत होणार आहे.

डहाणू तालुका पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील राहिल्यामुळे या ठिकाणच्या एकंदर विकासावर परिणाम झाला आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंद प्रस्तावित असून त्या दृष्टीने रस्त्यांची रुंदीकरण मजबुतीकरण व विस्तार केल्यास आगामी काळासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.

तलासरी तालुका दुर्गम असून या तालुक्यात रेल्वेची थेट जोडली नसल्याने तालुक्याचा विकास खुंटला आहे. या भागात नवीन पर्यायी रस्त्यांची उभारणी करणे नवीन पूल, साकाव बांधणे आवश्यक असून एमएमआर क्षेत्रात समाविष्ट झाल्यास शेती करणारा वर्ग तसेच नोकरीनिमित्त डहाणू व गुजरातकडे जाणाऱ्या वर्गाला लाभ होऊ शकेल.

विक्रमगडचा समावेश गरजेचा

वाडा व डहाणू तालुक्याला भौगोलिकदृष्टय़ा जोडणारा तालुका हा विक्रमगड असून, या ठिकाणी गेल्या काही वर्षांत पारंपरिक शेतीच्या पलीकडे मोगरा व नाचणी लागवड केली जात आहे. विक्रमगड तालुक्यात देहेर्जासारखे पाण्याचे स्रोत असून या ठिकाणी पायाभूत सुविधांचा स्तर उंचावला तर या संपूर्ण भागाचा कायापालट होऊ शकेल. या तालुक्यात पावसाळी पर्यटन व कृषी पर्यटनालादेखील वाव आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालघरमध्ये अतिक्रमणांमुळे पदपथ गिळंकृत

संबंधित बातम्या

पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा