पालघर : शासन वाचन संपदा वाढविण्यावर भर देत असताना पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये 36 शासनमान्य वाचनालय असून यातील 26 वाचनालय हे वसई विरार सारख्या शहरी भागात आहेत. तर उर्वरित १० वाचनालया पैकी सहा वाचनालय ही पालघर तालुक्यात असून इतर सहा तालुक्यांमध्ये फक्त चार वाचनालय कार्यरत आहेत. त्यामुळे डहाणू, तलासरी, मोखाडा व विक्रमगड या ग्रामीण आदिवासी भागात एकही सुसज्ज असे वाचनालय नसल्याने तरुण पिढी वाचनालयाच्या प्रतीक्षेत आहे.

सर्वत्र वाचनसंस्कृती आणि ग्रंथ वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. जिल्ह्यात देखील वाचन वाढीकरिता मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले असले तरीही आता मात्र वाचन करण्याकरिता तरुण पिढीला वाचनालयच उपलब्ध नाहीत. वाचनालयाकरिता शासनाकडून जिल्हा प्रशासनाला, नगरपरिषद व ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. वाचनालय करिता ग्रामपंचायतीला 50 हजार ते तीन लाखापर्यंत निधी मंजूर झालेला आहे. मात्र अनेक ग्रामपंचायती या निधीचा इतर ठिकाणी वापर करून वाचनालयासारख्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करतात.

पालघर जिल्ह्यातील सफाळे, चटाळे, माहीम या ग्रामपंचायत, केळवे येथील भारत वाचनालय, माकुणसार येथील मयूर वाचनालय तसेच जव्हार वाडा अशा काही ग्रामपंचायतींनी आपल्याकडील निधीचा सदुपयोग करून प्रशस्त वाचनालय उभारले आहे. यामुळे या भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण पिढीला व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.

पालघर नगर परिषदेचे वाचनालय धूळखात

पालघर नगरपरिषद हद्दीतील टेंभोडे येथे पूर्वी वाचनालय सुरू होते. मात्र तेथील अल्प प्रतिसाद व पुरेशा सुविधा नसल्याने ते वाचनालय अकार्यक्षम दाखवून बंद पाडण्यात आले. नंतर ते पालघर नगर परिषदेने हस्तांतरित केले. त्यानंतर पालघर नगर परिषदेच्या रेल्वे स्टेशन येथील जुना इमारतीच्या तळमजल्यावर ते काही प्रमाणात सुरू होते. मात्र नगरपरिषद स्थलांतरित झाल्यानंतर नगरपरिषद हद्दीतील बीएसएनएल कार्यालय येथे सावित्रीबाई फुले वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. मागील वर्षी नगरपरिषदेकडून याच वाचनालयाचे नव्याने उद्घाटन करण्यात आले होते. तरीही या वाचनालयाचा कोणीही वापर करत नसून तसेच पुस्तकांचा अभाव, सुसज्ज व्यवस्था नसल्याने हे वाचनालय धूळखात पडलेले आहे. तसेच ज्या इमारतीत हे वाचनालय आहे ती इमारत अतिधोकादायक असल्याचे नगररचना विभागाने जाहीर केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाचनालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या वाचनालयाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाचनालयात 60 हजाराहून अधिक पुस्तके असून साडेतीनशे सदस्य नोंदणी झालेली आहेत. या वाचनालयात दररोज 40 ते 50 मुले अभ्यासाकरिता येत असून स्पर्धा परीक्षा, बाल साहित्य, प्रश्नसंच, ग्रंथालय, शब्दकोश, कायदेविषयक तसेच अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके व वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांना वाचनास उपलब्ध आहेत. या वाचनालयाची मासिक फी फक्त पन्नास रुपये असल्याने अनेक वेळा येथील विद्यार्थी पुस्तके घरी नेऊन ती वाचून झाल्यावर पुन्हा आणून नवीन पुस्तके घेऊन जातात.

नगरपरिषदेचा वाचनालयाचा निधी गेला कुठे?

पालघर शहरात वाचनालय उभारण्याचे काम पूर्ण करण्यासोबत ई वाचनालय सुविधा उभारण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आला होता. मात्र नगर परिषद क्षेत्रातील अस्तित्वात असलेले वाचनालय दोन वेळा स्थलांतरित केल्यानंतर तिसऱ्यांदा देखील या वाचनालय कुलूप लावून बंद अवस्थेत असल्याने इ वाचनालय निधीचा वापर कुठे केला असा सवाल वाचक विचारत आहेत.

काही उत्कृष्ट वाचनालय

पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील रा. ही.सावे ग्रंथालय, महाविद्यालयाने सुरू केलेला वाचनवेल उपक्रम, वाडा येथील जिजाऊ वाचनालय, जव्हार येथील राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, पंचाळी, केळवे येथील कोमसाप चे वाचनालय, बहाडोली (मलवाडा), विक्रमगड, कोमण (वसई) येथील तरुणांनी, ग्रामपंचायतीने स्वखर्चातून उभारलेले वाचनालय पाहण्याजोगे आहेत.

जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरात नगरपरिषदेचे एकही उत्तम वाचनालय सध्या अस्तित्वात नाही. नवीन पिढीला ग्रंथ संपदा उपलब्ध करून देण्यात पालघर नगर परिषद अपयशी ठरत आहे. अनेक भागात तरुण वर्ग स्वखर्चाने वाचनालय उभारत असले तरीही शासनाचे प्रोत्साहन त्यांना मिळाल्यास सुसज्ज वाचनालय उभे राहण्यास हातभार लागेल. – समीर मणियार, पुस्तक प्रेमी

जिल्ह्यात शासनमान्य वाचनालयाची अत्यंत गरज आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गरीब मुलांना विनामूल्य पुस्तक उपलब्ध झाल्यास त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. काही ग्रामपंचायतींनी उभारलेले वाचनालय वाखाण्याजोगे आहेत. नगरपरिषद ग्रामपंचायत तसेच शासनाने वाचन संस्कृती वाढावी याकरिता वाचनालयांच्या वाढीवर भर द्यावा. – अमोल पाटकर, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक ग्रंथालय, प्रमुख