पालघर : रायगड व ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लू च्या लागण झाल्याबाबत संभाव्य घटना घडल्या असताना पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारे २० लाख कुक्कुटपालन पक्षी पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने राज्यातील काही भागात या आजाराची संभाव्य लागण लक्षात घेता आवश्यक दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यात तीन हजार पक्षांपेक्षा अधिक कूकुट पक्षी साठा असणारे ३५ नोंदणीकृत कुक्कुटपालन व्यवसायिक असून त्यांच्याकडे सद्यस्थितीत २० लाख पेक्षा अधिक कुकुट पक्षी आहेत. यापैकी सुमारे सव्वा लाख कुकुट पक्षांना लसीकरण करण्यात आले असून इतर पक्षांना लवकरात लवकर लसीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे.

इतर जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पक्षांच्या व्यवसायिकांचा एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रम २२ जानेवारी रोजी राबविला होता. यामध्ये कुकुट पक्षांची अनैसर्गिक अथवा मोठ्या प्रमाणात मरतुक झाल्यास स्थानिक पशुवैद्य अथवा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कुकूटपालन व्यवसायाशी संबंधित रोग व लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन अशा व्यवसायिकांना त्यांच्या पक्षांसाठी आरोग्य पूरक खाद्याचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यामध्ये ३००० पक्षांपेक्षा कमी असणाऱ्या पोल्ट्री व कुक्कुटपालन व्यवसायिकांची स्थानीय पातळीवर नोंदणी करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आला असून अशा छोट्या कुकूटपालन व्यवसायिकांना बर्ड फ्लू आजाराच्या शिरकाव रोखण्यासाठी जैव सुरक्षा व इतर आवश्यक उपाययोजना संदर्भात अवगत करण्यात येईल असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मधुवंती महाजन यांनी लोकसत्ता ला सांगितले.

पालघर जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाला नसला तरी सावधगिरीच्या उपाययोजना बाळगण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाशी संबंधित तसेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बर्ड फ्लू चे एकही प्रकरण जिल्ह्यात नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या त्यासंदर्भात कोणताही विशेष कक्ष स्थापन करण्यात आला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्याकडे विचारणा केली असता सांगितले.

चिकन दरामध्ये बदल नाही पालघर जिल्ह्यामध्ये चिकनचे घाऊकदर १४५ ते १५० रुपये प्रति किलो इतके स्थिर असून किरकोळ बाजारात चिकन १८० ते २०० रुपये प्रति किलो इतक्या दराने विकले जात असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांकडून प्राप्त झाली आहे. पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराने ग्रासलेला एकही कुकुट आढळून आला नसल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे भयभीत होण्याचे कारण नाही असे चिकन विक्रेत्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No bird flu cases found in palghar preventive measures by animal husbandry department zws