पालघर : पालघर जिल्ह्यातील डोल्हारी बुद्रुक गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर पूल नसल्याने गेल्या १५ वर्षांपासून येथील ग्रामस्थांना, विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना, बांबू आणि लाकडाच्या साहाय्याने तयार केलेल्या तात्पुरत्या आणि धोकादायक पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गावासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रथम लोखंडी पूल बांधण्याचे निश्चित करण्यात आले असून गावाला कायम स्वरूपी जोडणी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक हे गाव दुर्गम भागात असल्याने येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पावसाळ्यात पाणी वाढल्याने जनजीवन विस्कळीत होते. अशावेळी गावातील लोक स्वतःच वर्गणी जमा करून बांबू आणि लाकडाच्या साहाय्याने एक तात्पुरता पूल तयार करतात. मात्र हा पूल अत्यंत जीर्ण आणि कमकुवत असल्याने तो कधी कोसळेल याची भीती ग्रामस्थांना सतत सतावते. डोल्हारी बुद्रुक गावांतील खडकीपाडा, बार्हातपाडा व ठाकरपाडा या तीन पाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना, महिलांना व नागरीकांनां याच पुलावरून जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते. अनेकवेळा विद्यार्थी घसरून पाण्यात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

सुमारे ३० वर्षापुर्वी बांधलेला पुल १५ वर्षापुर्वी पुरात वाहुन गेला. १५ वर्षांपासुन गावकरी नवीन पुलाची मागणी करत असून देखील पुलाची दुरुस्ती देखील अद्याप करण्यात अली नाही. त्यामुळे या गावातील रहिवासी आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यपालांनी आदिवासी भागात दौरे करण्याची नागरिकांची मागणी

मागील वर्षी राज्यपाल रमेश बैस व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामपंचायत हद्दीतील १३ पैकी खोमारपाड्यात भेट दिली होती. तत्कालीन राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान खोमारपाडा गावाचा रातोरात विकास झाला होता. राज्यपालांच्या भेटीसाठी एका रात्रीत रस्ते, वीज आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर जर राज्यपालांनी डोल्हारी बुद्रुकसह परिसरातील इतर १२ गावांना भेट दिली, तर त्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल आणि या गावांचाही झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ग्रामस्थांची मागणी

गेली १५ वर्षांपासून ग्रामस्थ स्थानिक प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पक्क्या पुलासाठी निवेदने देत आहेत, विनंत्या करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन डोल्हारी बुद्रुक येथे पक्का पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नागरिकांच्या समस्या

विक्रमगड तालुक्यातील डोल्हारि बुद्रुक हे १०० टक्के आदीवासी वस्ती असलेले गाव आहे. डोल्हारी बुद्रुक ग्राम पंचायत अंतर्गत खडकीपाडा. बार्हातपाडा व ठाकरपाडा अशे तीन पाडे संलग्न आहेत. खडकी पाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेत जमीन बार्हातपाड्या व ठाकरपाड्याला लागुन आहे. त्यामुळे नदी पार करण्यासाठी हा एकच पुल त्यांच्यासाठी होता. बार्हातपाड्यातील व ठाकर पाड्यातील महिला, विद्यार्थी नागरिकांना बाजार, रेशन व शाळेत अंगणवाडीत व दवाखान्यात जाण्यासाठी खडकीपाडा पुल प्रवास करण्यास सोयीचा एकमेव मार्ग होता. नाल्याच्या पलीकडील बार्हात पाडा व खडकी पाड्यातील शेती निमित्त शेतात राहाणाऱ्या नागरिकांसाठी स्मशानवाटी खडकी पाड्याच्या पुढे असल्याने तेथील नागरिकांना पावसाळ्यात प्रेत यात्रा नदीच्या पाण्यातुन पार करून न्यावी लागते. पालघर जिल्ह्यातील खडकीपाडा बार्हातपाडा व ठाकर पाड्यातील महिला विद्यार्थी शेतकरी व नागरीक या कमकुवत व अस्थाई बांबुच्या लाकडी पुलावरून प्रवास करून जीव धोक्यात टाकत क्षणोक्षणी मरण प्रवास करत आहे. गरीब आदीवासी जनतेच्या जीवाशी सरकारी यंत्रणा खेळत असुन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट सरकार पाहात आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य आदिवासी ग्रामस्थांना पडला आहे.

डोलारी बुद्रुक व परिसरातील गावांसाठी सध्या तात्पुरती सोय व्हावी म्हणून लोखंडी पादचारी पूल जिल्हा परिषदेतर्फे उभारण्यात येणार आहे. या मार्गावरून वाहन जाण्यासाठी ३० मीटर पेक्षा अधिक लांबीच्या पुलाची आवश्यकता असून जिल्हा परिषदेकडे निधी ची मर्यादा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या उभारणी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर