विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे यशस्वी अंमलबजावणी करणे, माता बालसंगोपन, रुग्ण सर्वेक्षण, क्षयरोग निर्मूलन, आरोग्य संस्थांचा कायापालट, प्रशासकीय बाबीमध्ये सूसुत्रीकरण इत्यादी निकषांवर राज्यपातळीवरील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची क्रमवारी ठरवली जाते.
या क्रमवारीत गेली अनेक वर्ष पिछाडीवर असणाऱ्या पालघर जिल्ह्याने नोव्हेंबर महिन्यात २९ तर डिसेंबर महिन्यात ३१ वा क्रमांक प्राप्त केला होता. मूल्यांकन पद्धतीमध्ये पिछाडीवर पडण्यास कोणती कारणे आहेत याचा काटेकोर अभ्यास करून तशी जबाबदारी सोपविण्यात आली. शिवाय प्रशासकीय बाबींमध्ये जिल्ह्याने गेल्या दोन महिन्यांत आमूलाग्र बदल केला. गुण कमी होण्यास कारणीभूत असणारे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर व इतर कार्यक्रमांचे आयोजन. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग मूल्यांकनात पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपला. मूल्यांकन निर्देशांकांत तब्बल ११ गुणांची वाढ झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या मूल्यांकनात सातत्याने पिछाडीवर असल्याने त्यातील त्रुटींचा अभ्यास करून सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने भरीव काम केल्याने जिल्ह्याचे मूल्यांकन सुधारले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. या क्षेत्रातील सातत्य राखण्यासाठी आपला विभाग प्रयत्नशील राहील व सहकाऱ्यांचे योगदान कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही देशातील नामांकित संस्था असून सिकलसेल, अॅनिमिया, सर्पदंश, जन्मजात व्यंग, गर्भाशयमुख कर्करोग इत्यादी आजारांवर जिल्हा परिषदेमार्फत या संस्थेने आरोग्य संशोधन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी सहअन्वेषक म्हणून या संशोधनात जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे संस्थेने डॉ. दयानंद सूर्यवंशी व पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांना सन्मानित करण्यात आले.
आरोग्यविषयक कार्यक्रमांचे मूल्यांकन
माता-बाल आरोग्य व कुटुंब कल्याण, किशोरवयीन स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, एकात्मिक रोग सर्वेक्षण, असंसर्गजन्य आजार, गुणवत्ता आश्वासन, आरोग्यवर्धिनी कार्यक्रम, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील विविध कार्यक्रम, जन्ममृत्यू नोंदणी प्रणाली इ.मधील कामांच्या निर्देशकांमध्ये झालेल्या कामानुसार मूल्यांकन करण्यात आले असून एकूण प्राप्त गुणांनुसार क्रमांक देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांचे अहवाल सादरीकरण हे राज्य व केंद्र सरकारच्या विविध पोर्टलमार्फत केले जाते.
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात अव्वल
कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे, रुग्णांना शारीरिक व्यंग येण्याचे टाळणे तसेच कुष्ठरोग रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक उपचार चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्याचे सहाय्यक कुष्ठरोग निर्मूलन संचालक डॉ. संदीप गाडेकर, कुष्ठरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर यांनी या आजाराबद्दल जनजागृती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविल्याने वार्षिक मूल्यांकनात जिल्हा अग्रक्रमी आला आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय पर्यवेक्षक विजय इंगळे, कुष्ठरोग तंत्रज्ञान विवेक सूर्यवंशी व सांख्यिकी सहाय्यक विजय महाजन यांनादेखील त्यांच्या क्षेत्रात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.