पालघर : पालघर येथील वाघोबा खिंडीत पालघरला पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईन मधून काही ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्याठिकाणी मासवण येथील दोस्ती मैत्री ग्रुपने पाणपोई बांधून वाया जाणारे पाणी एका जागी साठवल्यामुळे खिंडीतील माकडांसह इतर प्राण्यांनाही पाणपोई तहान भागवण्यासाठी उपयोगी पडत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्य प्राण्यांसह पक्षी पिण्याच्या पाण्याच्या शोधात फिरत आहेत. पालघर मनोर मार्गावरील वाघोबा खिंडीतून पालघरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मोठमोठाले पाईपलाईन गेले आहेत. या पाईपलाईन ज्या भागात जुळतात तेथे काही ठिकाणी पाण्याची गळती होत असते. त्यामुळे वन्यप्राणी याच पाण्यावर आपली तहान भागवताना दिसतात. मात्र हे पाणी पिण्याकरिता त्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे मासवण येथील दोस्ती मैत्री ग्रुपने हेरले.
मासवण येथे राहणाऱ्या जवळपास दहा पुरुषांनी एकत्र येऊन दोस्ती मैत्री ग्रुप म्हणून आपला एक संघ तयार केला आहे. या संघातील दहा सदस्य एकत्र येऊन निसर्गाप्रती आपल्याला कोणते कार्य करता येईल याबाबत अनेकदा चर्चा करत असतात. निसर्ग करिता व प्राणी पक्षांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
या संकल्पनेतून त्यांनी याअगोदर श्रमदानातून वांदिवली, मासवण पवारपाडा व वसरे येथे वनराई बंधारे बांधले आहेत. तसेच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्राणी पक्षांकरिता वाघोबा खिंडीत दोन ठिकाणी वाहून जाणारे पाणी एका जागी साठविण्याकरिता श्रमदानातून पाणपोई उभारली. या पाणपोईमध्ये वाहणारे पाणी एकत्र होऊन एका जागी जमा होते. यामुळे भर उन्हात या पाणपोईमध्ये या खिंडीतील हजारो माकडे पाणी पिऊन थंड पाण्यात मनसोक्त उड्या मारताना दिसून आले आहेत.
पालघर येथील वाघोबा खिंडीत पालघरला पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईन मधून काही ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्याठिकाणी मासवण येथील दोस्ती मैत्री ग्रुपने पाणपोई बांधून वाया जाणारे पाणी एका जागी साठवल्यामुळे खिंडीतील माकडांसह इतर प्राण्यांनाही पाणपोई तहान भागवण्यासाठी उपयोगी पडत आहे. pic.twitter.com/3H5EaT2guH
— LoksattaLive (@LoksattaLive) April 20, 2025
गाई, बैल, म्हशी व जंगलातील इतर जनावर देखील या पाण्याद्वारे आपली तहान भागवत असतील अशी अपेक्षा दोस्ती ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही दोस्ती ग्रुपच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. वाघोबा घाटातील उपक्रम वन्यजीव संरक्षणासाठी लोकसहभागाचे उदाहरण ठरणार आहे.
पाणपोईत साठलेल्या पाण्यात माकडे पाणी पिताना व उड्या मारताना दिसून आल्याने समाधान वाटते. आमच्या या उपक्रमाला ग्रामपंचायत संस्था व प्रशासनाची मदत मिळाली नसून आम्ही सर्वांनी श्रमदानातून हे कार्य केले आहे तसेच निसर्ग साठी वृक्षारोपण व अनेक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. – अनंत पवार, दोस्ती मैत्री ग्रुप सदस्य, मासवण