पालघर: पालघर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि सव्वा सहा लाख खेळाडूंना संधी देणाऱ्या ‘सांसद खेळ महोत्सव २०२५’ चा आज ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनने उत्साहात आणि भर पावसात शानदार शुभारंभ झाला.
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद खेल महोत्सवात जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, वसई आणि पालघर या तालुक्यातील शालेय गट आणि खुल्या गटातील खेळाडू सहभागी झाले आहेत. सांसद खेल महोत्सवाचा शुभारंभ जवळपास अडीशे स्पर्धकांच्या सहभागाने मॅरेथॉनने झाला. विशेष म्हणजे, पहाटेपासूनच पालघर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मैदान चिखलमय झाले होते. मात्र, तरीही खेळाडूंच्या उत्साहावर याचा कोणताही परिणाम झाला नाही.
२ किलोमीटर आणि ३ किलोमीटर 14 व 17 वर्षाखाली मुले व मुली गटातील मॅरेथॉन स्पर्धा भर पावसात पार पडली. मुसळधार पाऊस सुरू असताना देखील स्पर्धक उत्साहाने धावत होते. खेळाडूंचा हा जोश आणि त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असे याप्रसंगी प्रतिपादन केले. या महोत्सवामुळे जिल्ह्यातील खेळाडूंचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
म. नी. दांडेकर हायस्कूल मैदान येथे मॅरेथॉन, व्हॉलीबॉल व लंगडी स्पर्धा आज संपन्न झाल्या असून या महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लंगडी, वैयक्तिक मैदानी स्पर्धा, मॅरेथॉन, बॅडमिंटन, योगा अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक खेळातील वयोगटातील विजेत्यांना रोख पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी स्पर्धेच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाकडून वॉटरप्रूफ पंडालची व्यवस्था
स्पर्धा व्यवस्थित पार पडाव्या आणि बदलत्या हवामानामुळे स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून म.नी. दांडेकर मैदानावर वॉटरप्रूफ पंडाल उभारण्यात आला आहे. आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे मैदान चिखलमय झाले होते. मात्र तरीही प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीमुळे आणि खेळाडूंच्या दुर्दम्य उत्साहामुळे दोन व तीन किलोमीटरची मॅरेथॉन मुसळधार पावसातही यशस्वीरित्या पार पडली. खेळाडूंचे धावण्याचे थरार अनुभवण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
