पालघर : इलेक्ट्रिक बाइकमध्ये नामांकित असलेल्या ओला दुचाकींच्या पालघर व परिसरातील दुचाकींची दुरुस्ती करण्यासाठी कंपनीची व्यवस्था अपुरी पडत असल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे बोईसर येथे ओलाचे शोरूम बंद पडल्याने गाड्या दुरुस्तीचा भार पालघर येथील शोरूमवर पडल्याने पालघर दुकानाबाहेर शेकडो गाड्या उभ्या आहेत.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना इंधनाची गरज नसल्याने त्याचा दैनंदिन वापराचा खर्च तुलनात्मक अत्यल्प आहे. यामुळे अनेकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास प्राधान्य दिले. याच वेळेला ओला या कंपनीने मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी केल्याने या कंपनीच्या दुचाकी खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ राहिला. अनेक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने तर इतर काहींनी पालघर बोईसर व परिसरात सुरू झालेल्या कंपनीच्या अधिकृत शोरूम मधून या दुचाकी एक लाख पेक्षा अधिक किमतीत खरेदी केल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात कंपनीकडे या इलेक्ट्रिक दुचाकीचे भाग व बॅटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी अडचणी येत होत्या. दरम्यान या पावसाळ्यात देखील याच अडचणी पुढे आल्यानंतर दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांना अनेक दिवस प्रतीक्षेमध्ये थांबावे लागले. त्याच बरोबरीने दुरुस्तीसाठी तांत्रिक कामगार (कुशल तंत्रज्ञ) सहजगत उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीचा वेग देखील मंदावला होता.
ओला दुरुस्ती करणाऱ्या शोरूम मधून नागरिकांना दुरुस्ती बाबत समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने काही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याने शोरूम चालकाला धमकावणी देण्याचे तसेच आंदोलन छेडण्याचे प्रकार घडल्याने बोईसर येथील ओला शोरूम महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. परिणामी पालघर व बोईसर परिसरातील गाड्यांना देखभाल दुरुस्तीसाठी पालघर बायपास मार्गावरील ओलाच्या अधिकृत वर्कशॉपचा आधार घेणे अनिवार्य ठरले. या वर्षांमध्ये देखील सुट्या भागांची टंचाई भासत असल्याने दुरुस्तीचा वेग धीमा असून अनेक नागरिकांमध्ये असंतोष उखळून आला आहे.
पालघर येथील ओला शोरूम व वर्कशॉप मध्ये दिवसभरात ग्राहक गर्दी करून तेथील कर्मचाऱ्यांशी वाद करीत असल्याने अनेकदा त्या शोरूमचे पुढचे शटर बंद ठेवून मागच्या बाजूने दुरुस्तीचे काम केले जात असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले. यामुळे लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात ओला कंपनीच्या अधिकृत शोरूमच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तसेच यासंदर्भात ओलाच्या दुरुस्ती विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सतीश फड यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दुरुस्तीसाठी येणाऱ्या ओला गाड्यांच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी उपलब्ध असणारे तज्ञ दीर्घकालीन रजेवर गेल्याने अडचणी वाढल्याचे सांगितले. एखाद्या गाडीमधील तांत्रिक बिघाडाचे कारण शोधून नंतर त्याच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्ट मागवण्यात येतात. त्यामुळे दुरुस्ती होण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य केले. पालघर येथील शोरूम समोर उभ्या असणाऱ्या गाड्यांनी ओला अँपवर आपल्या तक्रारी नोंदविल्या असून त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढत असून लवकरच दुरुस्ती संदर्भातील तक्रारीचे निवारण करू असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.