वाडा : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे.  सर्वच नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाडा – भिवंडी राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  हा पाऊस आणखी तीन दिवस राहणार असल्याने  मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

 पावसाचा मुक्काम आणखीन चार दिवस वाढल्यास त्याचा फटका भात पिकाला बसू शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. पावसामुळे  रस्ते उखडले आहेत. त्यामुळे वाहने नादुरुस्त होणे, वाहतूक कोंडी असे प्रकार दिसून येते. वाडा – भिवंडी महामार्गावर   वाहने चालविणे कठीण झाले आहे. दोन तासांच्या प्रवासाला चार तास लागत  आहे. डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये  जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंचाड – कुंर्झे  मार्गावरील देहेर्जे नदीवरील ब्राह्मणगाव येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक  शुक्रवारी सहा तास ठप्प झाली होती.  वैतरणा, तानसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे वाडा तहसीलदार  उद्धव कदम यांनी सांगितले.

पाऊस नोंद (मि.मी.) (१६ सप्टेंबपर्यंत)

वसई  ६३.६३

जव्हार  २९.३३ 

विक्रमगड २०

मोखाडा २७.३० 

वाडा ६७.७५

डहाणू  ४१.९०

पालघर ४१

तलासरी  २१

एकूण पाऊस  ३११.२८

नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे नदी जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला आहे.  मनोर परिसरातील वैतरणा, देहरजा आणि सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहेत. नदीचे पाणी भातशेतीमध्ये शिरले आहे. सूर्या नदीवरील धामणी, कवडास आणि वांद्री नदीवरील धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असलेल्या धरणाच्या पाणी साठय़ात वाढ होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अवजड वाहनांची वाहतूक वळवली 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर आणि ससूनवघर भागात पाणी साचल्याने महामार्गावरील अवजड वाहनांची मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक पोलिसांनी रोखली होती. ही वाहने वाडा-भिवंडी रस्त्यावर वळवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर  वाहतूक कोंडी झाली होती.