बोईसर : पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे भात कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी आणि चिखल कायम असून यामुळे शेतकऱ्यांना भाताची कापणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमिळून भाताचे सरासरी ७८६३६ हेक्टर क्षेत्र असून यावर्षी ७९१४९ (१०१%) हेक्टर क्षेत्रफळावर भाताची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे भाताच्या पिकाची चांगली वाढ झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे  भाताचे पीक मोठ्या प्रमाणात शेतामध्ये आडवे झाले होऊन नुकसान झाले आहे. भात पिकाच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागामार्फत  पंचनामे अजूनही सुरू आहेत. शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील जिल्ह्यात पावसाळी ढगाळ वातावरण  असून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. सद्यस्थितीत हळवे भात पीक पक्वतेच्या तर निमगरवे भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेत दाण्यांनी भरलेल्या लोंब्यामुळे पिकांचे वजन वाढलेले असते.

अशा अवस्थेत पावसामुळे भातपीक लवकर आडवे पडून पाण्यात भिजून लोंब्या खराब झाल्या आहेत. सतत पाऊस पडत राहिल्यामुळे लोंबी भिजून त्यास मोड येऊन लोंब्याना बुरशी आली आहे.सतत पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी भात खाचरातील पाण्याचा पुरेसा निचरा झालेला नाही. जिल्ह्यातून १० ते १२ ऑक्टोंबर दरम्यान पावसाच्या माघारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत स्वच्छ वातावरण आणि पावसाची पूर्ण उघडीप मिळत नाही, तोपर्यंत भात कापणी ला सुरुवात करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी  हळव्या भात कापणीला  सुरुवात केली होती, मात्र जोरदार पावसामुळे कापलेले भातपीक खाली पडले असून पावली काळी पडली आहे. पावलीची प्रत खालवल्यामुळे नुकसानीचा सामना सहन करावा लागत आहे.

 जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हळवे भातपीक कापणीस तयार झाले आहे.परंतु पावसाची शक्यता असल्याने भात पिकाची कापणी  शक्यतो १० ऑक्टोबर नंतर पावसाचा अंदाज बघून करावी. – डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल.