बोईसर : मनोर येथे उभारण्यात आलेला पालघर तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प समन्वयाअभावी बंद अवस्थेत आहे. उद्घाटनानंतर तीन महिन्यापासून बंद अवस्थेतील प्रकल्पामुळे कचरामुक्त गाव या जिल्हा परिषदेच्या संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याची नागरीकांची भावना आहे.

पालघर तालुक्यातील १३३ ग्रामपंचायत क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या ओला आणि सुक्या कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रकिया करण्यासाठी मनोर येथे तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर तीन महिने होऊन देखील प्रकल्प बंद अवस्थेत असून आत मधील यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे.  

या प्रकल्पात प्लास्टिकचा पुनर्वापर, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि ग्रामस्तरावर कचरा व्यवस्थापनामुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मनोर ग्रामपंचायतीकडे त्याचे हस्तांतरण करण्याचे ठरले होते. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाअभावी जिल्ह्यतील कचरा निर्मूलनाचा पहिलाच पथदर्शी प्रकल्प सुरु होण्याआधीच रखडला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र एकल वापर प्लास्टिक उत्पादनांवर बंदी असताना कारवाई बाबत अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालघर तालुक्यातील १३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील प्लास्टिक स्वरूपाचा कचरा एकत्रित करून त्यावर मनोर येथील तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत ३२ लाखांचा निधी देण्यात आला असून अनुभवी संस्थेसोबत करार करून निरुपयोगी प्लास्टिकचे गट व जिल्हानिहाय संकलन आणि वाहतुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

पालघर तालुकास्तरीय घनकचरा प्रकल्प पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्या ताब्यात आहे. प्रकल्प मनोर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु असून प्रकल्प उभारणीत असलेल्या काही त्रुटी दूर करून दिल्या जातील.

अतुल पारसकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद पालघर