वाडा: वाडा तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २६ जुन रोजी घडली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र हा मृत्यू शिक्षक तथा सरपंच यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप होत असुन शिक्षकावर निष्काळजीपणाचा व कर्तव्यात कसूराई केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून केली जात आहे.दरम्यान वाडा पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.वेदिका प्रकाश झाटे (वय ११ वर्षे) असे या सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बिलघर (ता.वाडा) येथील रहिवाशी आहे.
वाडा तालुक्यातील सोनाळे येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली वेदिका प्रकाश झाटे ही विद्यार्थीनी नेहमी प्रमाणे मैत्रिणीसोबत आपल्या घरातून सकाळी शाळेत गेली होती. शाळेची अल्पसुट्टी दुपारी ३.४० वाजता झाली होती. याच वेळी तिला अचानक चक्कर आली. चक्कर आल्याचे पाहून याच शाळेत ७ वी वर्गात असलेली वेदिकाची बहीण अन्य दुसऱ्या विद्यार्थिनींनी वेदिकाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षक मोतीराम नडगे व महिला शिक्षिकांना माहिती दिली. मात्र तेथील उपस्थित शिक्षकांनी वेदिकावर उपचार करण्यासाठी जवळच्या दवाखान्यात किंवा शाळेपासून अवघ्या एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या वडवली येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्याऐवजी थेट कारमधून तिच्या घरी सोडण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून केला जात आहे. याला शाळेतील मुख्याध्यापकांनी देखील दुजोरा दिला आहे.
वेदिका शाळेत अचानक चक्कर येवून बेशुद्ध का.? पडली याचे कारण तिच्या आई वडिलांना लक्षात आले नाही. त्यांनी वेदिकाला (मुलीला) दुचाकीवरून वाडा ग्रामीण रुग्णालयात संध्याकाळी ४:४५ वाजता उपचारांसाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासले असता मृत घोषित केले. मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने आई – वडिलांना मोठा धक्का बसला. दरम्यान, वेदिकाचे मृत्यूचे गूढ वाढले होते. वाडा ग्रामीण रुग्णालयात दुसऱ्या दिवशी वेदिकाचे शवविच्छेदन केले असता सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाले.
शिक्षकांचा निष्काळजीपणा भोवला?
वेदिका झाटे हि शाळेत गेली असताना तिला सर्पदंश झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून समजते. सकाळी शाळेत गेल्यावर वेदिकाला दुपारच्या अल्प सुट्टीत अचानक चक्कर आली व ती बेशुद्ध पडली. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी घाबरले, मात्र चक्कर नक्की कशामुळे आली याचे कारण अस्पष्ट होते.सोनाळे हायस्कूलमधील शिक्षक असलेले मोतीराम चांगो नडगे हे कापरी- वडवली- बिलघर या ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच देखील आहेत.शाळेजवळ हाकेच्या अंतरावर एक खाजगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असताना वेदिकाला तिथे उपचारांसाठी न नेता थेट तिच्या दोन किमी अंतरावर असलेल्या बिलघर येथे घरी कारमधून आणून सोडले.वेदिका ही भोवळ येवून बेशुद्ध पडली असताना खर तर तिला उपचारांची आवश्यकता असल्याने तिला घरी सोडण्या ऐवजी तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करणे शिक्षकांचे व लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य होते.मात्र शिक्षक तथा सरपंच मोतीराम नडगे यांनी ते केले नाही.
वेदिकाला वेळीतच उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. मात्र यात शिक्षकांचा निष्काळजीपणामुळे (हलगर्जीपणा) वेदिकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता वेदिकाच्या आई व नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शिक्षक मोतीराम नडगे हे केवळ शिक्षकच नाहीत तर कापरी-बिलघरचे सरपंच म्हणजेच लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा हा निष्काळजीपणा एका मुलीच्या जीवावर बेतला असल्याच्या परिसरातून व्यक्त होत आहे. दरम्यान वेदिकाच्या आकस्मित मृत्यू बाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.या वेदिकाच्या निष्काळजीपणाने ओढवलेल्या मृत्यूबाबत सोनाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक वसंत महाले यांनी देखील “लोकसत्ता”शी बोलताना चूक झाल्याचे मान्य करत दुजोरा दिला आहे.
अल्पसुट्टीत वेदिकाला भोवळ आली. आम्हाला वाटले की तिला साधी भोवळ आहे. शाळेत अशा घटना घडतात. गंभीर प्रकार वाटला नसल्याने तिला दवाखान्यात न नेता तिच्या घरी शिक्षकांनी सोडले.मात्र आमची मोठी चूक झाली.- वसंत महाले , मुख्याध्यापक- न्यू इंग्लिश हायस्कूल, सोनाळे