कचराभूमी नसल्याने डहाणू नगर परिषदेची अडचण

डहाणू: डहाणू नगर परिषद कचरा साठवत असलेल्या सरावलीच्या कचराभूमीचा कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. नगर परिषदेकडे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत:च्या मालकीची कचराभूमी निर्माण करता आलेली नाही. शहरात दररोज साठणारा पाच टन कचरा कुठे टाकावा ही गंभीर समस्या पालिका प्रशासनापुढे सध्या उभी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डहाणू नगर परिषदेने वारंवार जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र भूखंडाची मागणी केली आहे. मात्र त्याला दिरंगाई होत नसल्याने डहाणूत कचराकोंडीचा सामना करावा लागत आहे. सरावली येथे कचरा टाकू नये अशी रहिवाशांची मागणी आहे. डहाणू नगर परिषदेकडे स्वत:चे डंपिंग ग्राऊंड नसल्याने दररोज जमा होणाऱ्या पाच टन ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावयची या विवंचनेत येथील ठेकेदार व प्रशासन आहे. नगर परिषदेची स्थापना होऊन ३६ वर्षे होत आहेत. या कालावधीत १५ मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र अद्याप डहाणूच्या कचराभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी कचऱ्याच्या विल्हेवाटीची गंभीर समस्या भेडसावत आहे.

डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये नगर परिषदेत रूपांतर करण्यात आले. मात्र नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्यात कोणतेही सामंजस्य होत नसल्याने डहाणू शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या गंभीर बनली आहे.

नगर परिषदेकडे स्वत:ची कचराभूमी नसल्याने ठेकेदाराला कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे कचऱ्याच्या या समस्येमुळे ठेकेदारच नव्हे तर नागरिकसुद्धा वेठीस धरले जात आहेत. परिणामी कचरा ठेका घ्यायला कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे.

डहाणूत कचऱ्यासाठी स्वतंत्र भूखंड मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्याचे अवर सचिवांनी, जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन कचऱ्यासाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगराध्यक्ष यांनी केली आहे.

डहाणू नगर परिषदेच्या कचराभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचा योग्य पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार आहोत.

– भरत राजपूत, नगराध्यक्ष, डहाणू नगर परिषद

डहाणू नगर परिषदेची लोकसंख्या ८० हजारावर आहे. मात्र, ३२ वर्षांनंतरही कचराभूमी उपलब्ध न होणे ही शोकांतिका आहे.

– किसन जयस्वाल, रहिवासी

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stink from rotten garbage ssh