डहाणू :डहाणू आणि तलासरी तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या ऐतिहासिक बारड गडावर बुधवार, २ जुलै रोजी हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केली. बारजाई देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी आलेल्या या भाविकांनी पारंपरिक तसेच आधुनिक वाद्यांच्या तालावर नाचगाणे करत आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक उत्साहाचे दर्शन घडवले. हा दिवस आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

बारड गडाला केवळ आदिवासींच्या पारंपरिक देवदेवतांमुळेच नव्हे, तर भारतातील पारसी समाजातील अग्नी देवतेचे प्रथम स्थान म्हणूनही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. या अद्वितीय संगमामुळे बारड डोंगर हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे.

बारड गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये बारजाई देवी आणि इतर स्थानिक देवतांविषयी प्रचंड आदरभाव आहे. प्रत्येक वर्षी २ जुलै रोजी या परिसरातील आदिवासी बांधव सहकुटुंब गडावर येतात आणि देवी-देवतांचे दर्शन घेतात. जाणकारांच्या माहितीनुसार, आदिवासी समाजात बारड गडावरील देवतांना विशेष महत्त्व दिले जाते. पाऊस चांगला यावा, शेतीचे पीकपाणी चांगले व्हावे, तसेच मुले-बाळे आणि जनावरे सुरक्षित राहावीत यासाठी ते येथे देवाला साकडे घालतात. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात जपली जात आहे, हे येथे आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते.

गेल्या काही वर्षांपासून बारड गडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आता केवळ पालघर जिल्ह्यातीलच नव्हे, तर केंद्रशासित प्रदेश आणि नाशिक भागातील आदिवासी बांधव देखील आवर्जून या डोंगरावर हजेरी लावतात. गडावरील देवी-देवतांचे दर्शन घेतल्यानंतर, या ठिकाणी आदिवासींची पारंपरिक वाद्ये जसे की तारपा, धुमश्या, ढोल-ताशे, आणि आधुनिक वाद्यांच्या तालावर नाचून-गाऊन आनंद व्यक्त केला जातो. या उत्सवात हजारो नागरिक सहभागी होतात आणि पारंपरिक नृत्यांनी व गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हा उत्साह पाहून सांस्कृतिक एकोपा आणि पारंपरिक मूल्यांचे जतन किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते.

बारड डोंगराचे पारसी समाजातील महत्त्व –

पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि बोर्डी परिसरात वसलेल्या पारसी समाजात देखील बारड डोंगराला विशेष महत्त्व आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसी लोक पहिल्यांदा भारतात तत्कालीन महाराष्ट्र राज्यातील (सध्या गुजरातमध्ये असलेल्या) संजान आणि उदवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर आले होते. पारसी समाज अग्नी देवतेची पूजा करतो. त्यावेळी आपल्या मायदेशातून आणलेली अग्नीज्योत अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी पारसी समाजाने ती बारड डोंगरावर ठेवली होती. म्हणूनच पारसी समाजात या डोंगराचे ऐतिहासिक महत्त्व असून, आजही अनेक पारसी बांधव या डोंगरावर येऊन आपल्या श्रद्धास्थानी पूजा-अर्चा करतात. हा डोंगर केवळ आदिवासींसाठीच नव्हे, तर पारसी समाजासाठीही एक पवित्र स्थान आहे, जे विविध संस्कृतींच्या एकत्रिकरणाचे प्रतीक बनले आहे.

बारड गडावरील उत्सवासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश

डहाणू तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बारड डोंगरावर दरवर्षीप्रमाणे २ जुलै रोजी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींनी पायी चढाई केली. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सीडबॉल वाटपाचा उपक्रम यंदाही राबवण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना कोसबाड लिलकपाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांची असून, परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सीडबॉल तयार केले.

हे सीडबॉल अस्वाली डोंगराच्या पायथ्याशी कापडी पिशव्यांमध्ये भरून बारड डोंगरावर चढाईसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना वाटप करण्यात आले. ओसाड जागांमध्ये हे सीडबॉल टाकून निसर्ग संवर्धनास हातभार लावावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या सीडबॉलमध्ये स्थानिक प्रजातींच्या जंगलात उगवणाऱ्या झाडांच्या बिया असून, भविष्यात या डोंगर परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होणार आहे.

यावेळी निसर्गप्रेमींना प्लॅस्टिक मुक्तीबाबतही आवाहन करण्यात आले. खाद्यपदार्थांची प्लॅस्टिक पाकिटे, कोल्ड्रिंकच्या बाटल्या व इतर प्लॅस्टिक साहित्य डोंगरावर फेकू नये. त्याऐवजी हे साहित्य परत सोबत घेऊन यावे व पायथ्याशी ठराविक ठिकाणी जमा करावे, जेणेकरून त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल, असेही नागरिकांना बजावण्यात आले. बारड गड परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात कोसबाड लिलकपाडा जि. प. शाळेचे शिक्षक दीपक देसले, मानपाडा शाळेचे शिक्षक पंकज नरवाडे तसेच घोलवड ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र बुजड यांचा विशेष सहभाग होता.

सीडबॉल वाटप उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून आतापर्यंत सुमारे वीस हजार सीडबॉल या परिसरात निसर्गप्रेमींच्या माध्यमातून टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सीडबॉल घेऊन गेलेल्या अनेक निसर्गप्रेमींनी यावर्षी स्वतःहून पुन्हा सीडबॉल मागून घेतले. यावरून पर्यावरणाविषयी जागरूकता वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. या उपक्रमामुळे डोंगर परिसरात फुलणारी हरित वनराई आणि नागरिकांमध्ये निर्माण होणारी पर्यावरण साक्षरता हाच खरा उद्देश असून, तो हळूहळू सफल होत असल्याचे आम्हाला समाधान आहे. अशी भावना शिक्षक दीपक देसले आणि सरपंच रवींद्र बुजड यांनी व्यक्त केली.