डहाणू : डहाणू नगर परिषद हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे डहाणूकर त्रस्त झाले असून प्रशासनाच्या उदासीन धोरणाबाबत त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच अनेक उपविभागीय अधिकाऱ्यांनी (प्रांत) अनेक बैठका घेऊन निर्णय घेतले; परंतु त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नसल्यामुळे कोंडीची समस्या कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने दररोज मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी ग्रामस्थ येथे येत असतात. परंतु सेंट मेरी हायस्कूल, मसोली, सागर नाका, रेल्वे स्थानक येथे रोजच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यातच बाजारपेठेत येणारे नागरिक कुठेही वाहन पार्किंग करून शहरात फिरत असल्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. रेल्वे स्थानक ते सागर नाक्यापर्यंत रस्त्याच्या मधोमध काही खासगी वाहने पार्किंग केली जातात. रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडी विक्रेत्यांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेते, ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असते. याआधी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी डहाणू नगर परिषद तसेच पोलिसांना सूचना देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. काही दिवस त्या आदेशाची अंमलबजावणी झाली; परंतु पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. 

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam serious concern in dahanu nagar parishad zws
First published on: 29-09-2022 at 01:09 IST