वाडा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या विकासाचे मॉडेल तयार करावे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे आणि राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त करून जिल्ह्याचे नाव गौरवाने उजळवावे.” असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
बुधवार १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे वाडा येथे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली वाडा पंचायत समिती प्रशिक्षण सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) अतुल पारस्कर, गटविकास अधिकारी वाडा वैभव शिंदे तसेच वाडा तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
या बैठकीत तालुकास्तरावरील विविध विभागांच्या विकास कामांचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व प्रलंबित विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन गती द्यावी, तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. तसेच “कामांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी हिच खरी प्रगतीची ओळख असुन प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे.”
अशा सुचना (निर्देश) मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून या अभियानात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन तालुका आणि जिल्हास्तरावर पुरस्कारप्राप्तीचे लक्ष्य साध्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले.
आढावा सभेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वाडा तालुक्यातील भुजडपाडा शाळा आणि अंगणवाडी केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. तसेच प्रधानमंत्री जनमन घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, जलसंधारण, पोषण, तसेच सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून ‘समृद्ध ग्राम – समृद्ध जिल्हा’ या ध्येयाकडे ठोस पावले टाकत असून, सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून या बैठकीत करण्यात आले.
