-

लोकप्रियता, कलाविश्वात मानाचं स्थान आणि खासगी आयुष्यात आलेलं अपयश अशी आयुष्याची घडी बसलेली एक अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. 'ट्रेजेडी क्वीन' किंवा 'मल्लिका-ए-जज्बात' म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. अशा या सौंदर्यवतीची आज आहे जयंती. सौंदर्याला कोणत्याही परिसीमा नसतात हे मीना कुमारी यांच्याकडे पाहून लगेचच लक्षात येतं. त्यांचा आवाज, बोलके डोळे, देहबोली.. त्या निभावत असलेल्या पात्राच्या अंतकरणातील सुखदुखाचे अनुवाद करायचे.
-
‘मीना’ या फारसी शब्दाचा अर्थ मदिरेची सुरई अथवा पेला अन् मीना कुमारी म्हणजे मद्य किंवा साकी (जी मद्यप्यांना मद्य देते ती.) खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या संवेदनशील स्त्रीला अतृप्तता, तृषार्तता अन् संयोग वियोगाचा शापच मिळाला असावा, हे त्यांच्या जीवनाकडे पाहून लक्षात येतं.
-
मीनाकुमारी यांचं मूळ नाव माहजबी बानो होतं. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ ला झाला होता. मीना कुमारींचे वडील अली बक्ष हे चित्रपटात छोटय़ा भूमिका करत असत. ते उर्दू काव्यही करत. मीनाकुमारींची आई प्रभादेवी या त्यांच्या दुसरी पत्नी (लग्नानंतरची इकबाल बानो) त्या एक नर्तकी होत्या अन् टागोर परिवारातील होत्या.
-
अली बक्ष यांची सांपत्तिक स्थिती पहिल्या पत्नीपासून हलाखीची होती. त्यांना दोन मुली होत्या. कुटुंबासाठीच मीनाकुमारी यांना सातव्या वर्षांपासून बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करावं लागलं. त्यामुळे त्यांचं शालेय शिक्षण झालंच नाही. कुटुंबाचा आर्थिक भार एवढय़ा लहान वयातच त्यांच्यावर पडला.
-
१९५२ साली मीनाकुमारींची प्रमुख भूमिका असलेला ‘बैजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. त्याच वर्षी त्यांनी कमाल अमरोही या त्यांच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं.
-
पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीनाकुमारी या धक्क्यातून सावरल्या नाहीत आणि त्या गंभीर आजारी झाल्या.
-
एक वेळ अशीही आली जेव्हा मीना कुमारी मदिरेच्या पूर्णत: आहारी गेल्या होत्या.
-
'पाकिजा' हे कमाल अमरोहींचे सुंदर स्वप्न होते. हा चित्रपट बनण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला. आपल्या दीर्घ आजारातही त्यांने हा चित्रपट पूर्ण केला. त्याच काळात भारत-पाक युद्धास सुरुवात झाली. आणि चित्रपट सुपर फ्लॉप ठरला.
-
'पाकिजा' प्रदर्शित झाल्यानंतर केवळ आठ महिन्यानंतर मीनाकुमारी यांच्या दु:खद निधनाची बातमी सर्वदूर पोहोचली. त्यांच्या मृत्यूनंतर 'पाकिजा' ला नव्याने प्रदर्शित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने मात्र मृतवत 'पाकिजा' मध्ये प्राण ओतले आणि या चित्रपटाने देशात अनेक आठवडे हाऊसफुल्ल ठरून नवनवीन रेकॉर्ड नोंदविले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कमाल अमरोही एकदम धनाढ्य झाले. ती खऱ्या अर्थाने मीना कुमारी यांच्याच योगदानाची मोहोर होती हे खरं.
हिंदी चित्रपटसृष्टीची ‘मलिका-ए-जज्बात’
Web Title: Remembering tragedy queen bollywood actress meena kumari on her 85th birth anniversary