'शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबीयांसमवेत भातलावणी केली. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला. यावेळी त्यांनी फेसबुकद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. प्रविण तरडे म्हणाले की, "सध्या लॉकडाउनमुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. यामुळे मी आपल्या कुटुंबीयांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे." "करोनामुळे यंदा वारी झाली नाही. यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात," असं ते म्हणाले. पुण्या – मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे असे सांगत आपलं शेत आपण कसले पाहिजे असंही ते म्हणाले. प्रविण तरडे मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
प्रविण तरडेंनी कुटुंबीयांसोबत मिळून शेतात केली भातलावणी
शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा वाढदिवस
Web Title: Pravin tarde celebrated fathers birthday in a unique way worked in a farm ssv